सोशल मीडियावर बदनामीची धमकी देत महिला पोलीस उपनिरीक्षकाकडून उकळली खंडणी; लोणीकंदमध्ये गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2021 09:18 PM2021-07-08T21:18:50+5:302021-07-08T21:21:19+5:30
फिर्यादींना सोशल मीडियावर फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले.
पुणे : सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत एका महिला पोलीस उपनिरीक्षकाकडूनच पैसे उकळणाऱ्या तरुणाविरुद्ध लोणीकंद पोलिसांनी खंडणी, जबरी चोरी आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
सिद्धांत भगवानराव जावळे (वय ३०, रा. माजलगाव, जि. बीड) असे या संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी २८ वर्षाच्या महिला पोलीस उपनिरीक्षकाने फिर्याद दिली आहे. हा प्रकार वाघोली परिसरात सप्टेंबर २०२०पासून सुरु होता.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा फिर्यादीचा मित्र आहे. तो सतत घेत असलेल्या संशयामुळे व त्यातून करत असलेल्या शिवीगाळ आणि मारहाणीला कंटाळून फिर्यादीने त्याला लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला होता. तेव्हापासून तो फिर्यादींच्या नातेवाईकांना फोन करून फिर्यादीसोबत त्याचे लग्न लावून द्या, नाहीतर मी आत्महत्या करेन, अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देत होता. एवढेच नाही तर आरोपीने सोशल मीडियावर फिर्यादीचे त्याच्यासोबत असलेले फोटो, व्हिडीओ बदनामी करण्याच्या उद्देशाने प्रसारीत करून त्यांच्याकडील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर तुझी नोकरी सोडून दे, पाच वर्षाचा पगार मला दे किंवा तत्काळ माझ्याशी लग्न कर असे म्हणत वेळोवेळी फिर्यादींना फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत पैसे उकळले. आरोपी फिर्यादींकडे पैशासाठी तगादा लावत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
दरम्यान, आरोपीकडून सतत होणार्या त्रासाला कंटाळून फिर्यादी महिला पोलिस उपनिरीक्षकाने सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अर्जावरून लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करीत आहेत