‘शक्ती आणि भक्तीसाठी, कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी’ पुण्यातील सात धावपटूंची ‘रनवारी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:09 AM2021-06-24T04:09:45+5:302021-06-24T04:09:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : ‘विठूच्या भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून विठूरायाचे दर्शन घडलेले नाही. यंदाही आळंदी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ‘विठूच्या भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांना कोरोनामुळे गेल्या वर्षीपासून विठूरायाचे दर्शन घडलेले नाही. यंदाही आळंदी आणि देहू येथून निघणाऱ्या वैष्णवांचा मेळा पाहाता येणार नाही. कोरोनाने वारीची परंपराच जणू खंडित झाली आहे. मात्र, महाराष्ट्राच्या ‘शक्ती आणि भक्तीसाठी, कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी’ कोरोना नियमांचे पालन करून सात धावपटू हे ‘रनवारी’ करणार आहेत. उद्या (गुरुवारी) सायंकाळी ६ वाजता आळंदी येथून सुरू होणारी ही रनवारी शनिवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता २४० किलोमीटरचे अंतर पार करून पंढरपूर येथे पोहोचणार आहे.
भूषण तारक, स्वामीनाथन श्रीनिवासन, जनार्दन कत्तुल, चंद्रकांत पाटील, अजित गोरे, संतोष कोकरे आणि संतोष शेळके हे सात धावपटू या रनवारीमध्ये सहभागी होत आहेत. यातील पाच जण हे पिंपरी-चिंचवड भागातील तर दोघे लोणंद येथील आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी पालखीमार्गे ही ‘रनवारी’ ते पूर्ण करणार आहेत. विशेष म्हणजे, हे सातही जण ‘अल्ट्रा मॅरेथॉन’ धावपटू आहेत. प्रशांत भोसले, दिगंबर जानभरे, नंदकुमार मुसळे आणि तानाजी देवकर हे त्यांचे पाच मित्र दोन गाड्यांसह या धावपटूंसोबत मदतीसाठी राहणार आहेत.
या ‘रनवारी’चे समन्वयक भूषण कटक यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मी २०१७ मध्ये रनिंग सुरू केले होते. त्यामुळे गेल्या तीन ते चार वर्षांपासून आळंदी ते पंढरपूर हे अडीचशे किलोमीटर धावण्याची इच्छा होती. मात्र नोकरी आणि व्यवसायामुळे ते शक्य झाले नाही. यावर्षी ही संकल्पना मित्रांना सांगितली. यापूर्वी आम्ही विविध मॅरेथॉनमध्ये सहभाग घेतला आहे. १६१ किलोमीटरची २८ तासांची मॅरेथॉन यांसह आफ्रिकेमध्ये ९० किलोमीटरच्या मॅरेथॉनचा आम्हाला अनुभव आहे. दर वर्षी पालखीची शेकडो वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे आम्ही वारकऱ्यांचे प्रतिनिधित्व करण्याच्या उद्देशाने ही वारी करणार आहोत. ‘रनवारी’चे हे २४० किलोमीटरचे अंतर ४२ तासांत करण्याचा आमचा मानस आहे. सलग धावणार असलो तरी १५ ते २० मिनिटे विसाव्यासाठी थांबणार आहोत. सर्वांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
----------------------------------------------------------------------------------------
आम्ही ‘रनवारी’ करीत पालखी मार्गाच्या गावात प्रवेश करणार असलो, तरी ग्रामस्थांना कोणतीही कल्पना दिलेली नाही. कोरोनाचे नियम पाळून ही वारी आम्हाला करायची आहे. त्यामुळे त्या त्या गावात असणाऱ्या आमच्या काही मित्रमंडळींनाच फक्त याबद्दल सांगितले आहे. - भूषण कटक, समन्वयक, ‘रनवारी’
------------------------------------------------------------------------------------
फोटो- रणवारी, रणवारी लोगो