गाव करेल ते राव करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:09+5:302021-02-14T04:11:09+5:30

इंदापूर : आम्ही ३८ ग्रामपंचायतींचा दावा केला होता, मात्र आज ३७ ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित आहेत. आमच्याकडे आहेत. यंदाच्या ...

Rao will not do what the village does | गाव करेल ते राव करणार नाही

गाव करेल ते राव करणार नाही

Next

इंदापूर : आम्ही ३८ ग्रामपंचायतींचा दावा केला होता, मात्र आज ३७ ग्रामपंचायतींचे सरपंच उपस्थित आहेत. आमच्याकडे आहेत. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत तालुक्यातील ६० टक्के नागरिकांनी भाजपला कौल दिला आहे. त्यामुळे आता कोणीही बोलण्याची गरज नाही. गाव करेल ते राव करणार नाही याची दखल घ्यावी. जनता सत्तेच्या मागे नाही तर सत्याच्या मागे जाणारे आहेत, असा टोला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना नाव न घेता लगावला.

इंदापूर शहरातील शहा सांस्कृतिक भवन येथे शनिवारी (दि. १३) इंदापूर तालुक्यातील नूतन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य यांचा सन्मान भाजपच्या वतीने माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते गळ्यात भाजपाची पट्टी टाकून करण्यात आले. यावेळी कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे, मयूरसिंह पाटील, अर्बन बँकेचे चेअरमन भरत शहा, हर्षवर्धन पाटील मोटार वाहतूक संघाचे चेअरमन रघुनाथ राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले, पंचायत समिती सभापती स्वातीताई शेंडे, उपसभापती संजय देहाडे, वरकुटे खुर्द सरपंच बापूराव शेंडे, मंगेश पाटील उपस्थित होते.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, सध्या राष्ट्रपती होणे सोपे आहे, मात्र ग्रामपंचायत सदस्य होणे खूपच अवघड आहे. समाजकारणातील सर्वात महत्त्वाचे साधन ग्रामपंचायत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मी आणि आप्पासाहेब जगदाळे भेटून इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीची यादी देऊन, केंद्रातून विकास निधी मागवून घेणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी काही काळजी करण्याची गरज नाही. त्याचबरोबर सामजिक सलोखा निर्माण करण्याचे काम राज्य सरकारचे आहे, मात्र तसे हे तीन चाकांचे रिक्षा असलेले सरकार करताना दिसून येत नाही.

मागील सहा महिन्यांत दूधगंगा डेअरीने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना पन्नास कोटी रुपये कमवून दिले आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना खूप मोठी मदत झालेली आहे. विरोधकांनी घेतलेल्या सभेत, चिठ्ठ्या आणि शिट्ट्या शिवाय काहीच नव्हते.

भाजपचे काम आम्ही प्रामाणिकपणे करणार असून, कायम सोबत राहू, आपली सत्ता नसली तरी सर्व कार्यकर्ते हर्षवर्धन पाटील यांच्या बरोबर आहेत, आम्हीही सर्व ताकदीने सोबत राहू, अशी ग्वाही कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आप्पासाहेब जगदाळे यांनी दिली.

प्रास्ताविक ॲड. शरद जामदार यांनी केले, तर सूत्रसंचालन रघुनाथ पन्हाळकर यांनी केले. आभार कैलास कदम यांनी मानले.

व्यासपीठावर केवळ तीन गावांचा सन्मान

इंदापूर येथे भाजपच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात व्यासपीठावर कुंभारगाव, कचरवाडी, सरडेवाडी या तीनच ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. बाकी सर्वांचा बसलेल्या जागेवर सन्मान केला, त्यामुळे भाजपाच्या विचाराच्या एकूण ग्रामपंचायती किती, याबाबत तालुक्यात चर्चा रंगली आहे.

१३ इंदापूर हर्षवर्धन पाटील

इंदापूर येथे नूतन सरपंच, उपसरपंच यांचा सन्मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर.

Web Title: Rao will not do what the village does

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.