कर्मचाऱ्याच्या पत्नीवर बलात्कार; बॉसला सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 01:20 AM2018-06-23T01:20:50+5:302018-06-23T01:20:53+5:30
कामाला असलेल्या कर्मचा-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या कंपनीच्या मालकाला सात वर्षे तुरुंगवास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा आदेश दिला.
पुणे : कामाला असलेल्या कर्मचा-याच्या पत्नीवर बलात्कार करणा-या कंपनीच्या मालकाला सात वर्षे तुरुंगवास व १५ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. विशेष न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी हा आदेश दिला.
शेषराम रामदत्त मौर्या (वय ३५, रा. सुंदर आकाश सोसायटी, हडपसर) असे शिक्षा दिलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या पतीने कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली होती. त्यानुसार मौर्या याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये पिसोळीत हा प्रकार घडला होता.
मौर्या याची पिसोळी येथील कुमार अॅन्ड सन्स ही स्लायडिंग विंडो बनविण्याची कंपनी आहे. या कंपनीत पीडितेचा पती कामाला होता. त्यामुळे मौर्या याने त्याचा पिसोळीतील हिल व्ह्यू सोसायटीतील फ्लॅट फिर्यादी यांना राहण्यासाठी दिला होता. घटनेच्या दिवशी फिर्यादी काही कामानिमित्त बाहेर गेले असता मौर्याने पीडितेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकीही दिली होती. याबाबत तक्रार दिल्यानंतर तत्कालीन महिला पोलीस उपनिरीक्षक अश्विनी पाटील, पोलीस हवालदार रवींद्र भोसले, विशाल गवळी यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.
सरकारी वकील सुरेश गवळी यांनी या खटल्याचे कामकाज पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक गणेश कुलाल, सहायक पोलीस फौजदार सुनील कोलते आणि राजेंद्र नलावडे यांनी कामकाज पाहिले. दंडाच्या रकमेतील १० हजार रुपये पीडित महिलेला देण्यात यावे, असे न्यायालयाने दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाºयाला अटक
पुणे : अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवल्याप्रकरणी येरवडा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला २६ जूनपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे. राजा होनप्पा अंकुशी (वय १८, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. ३३ वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली. १३ जून २०१८ रोजी रात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली. फिर्यादी यांचे कुटुंब झोपडीमध्ये झोपलेले असताना १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले, असे फिर्यादीमध्ये नमूद केले आहे. याप्रकरणी अंकुशी याला न्यायालयात हजर केले असता, त्याने पीडित मुलीला कोठे पळवून नेले होते?, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील शुभांगी देशमुख यांनी केली.
गृहकर्ज मिळवून देण्याच्या बाहण्याने सव्वा लाखाची फसवणूक
पुणे : गृहकर्ज मंजूर करून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेकडून सव्वा लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघड झाला आहे. वैशाली चोरघे (वय ३८, रा. कात्रज) यांनी भारती विद्यापीठ पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार एक पुरुष व दोन महिलांवर गुन्हा दाखल केला आहे. २ जानेवारी ते २१ जूनदरम्यान हा सर्व प्रकार घडला.
।वैमनस्यातून कोयत्याने वार करणाºया दोघांना कोठडी
पुणे : पेट्रोल भरण्यासाठी गेलेल्या एकावर पूर्ववैमनस्यातून कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोघांना सहकारनगर पोलिसांनी अटक केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. एस. पानसरे यांनी दोघांना २५ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. इस्माईल मौलानी मकानदार (वय २०, रा. संतोषनगर, कात्रज, मूळ रा. अक्कलकोट, जि. सोलापूर) आणि अजहरउद्दीन ऊर्फ अजहर दिलावर शेख (वय १९ रा. अंजलीनगर, कात्रज, मूळ रा. सोलापूर) अशी पोलीस कोठडी झालेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत ऋतिक दत्तात्रय सोनवणे (वय १८, रा. विद्यानगर, कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे. १ एप्रिल २०१८ रोजी बालाजीनगर येथील धनकवडे पेट्रोलपंपासमोर हा प्रकार घडला होता.