जन्मदात्यानेच जिवे मारण्याची धमकी देत मुलीवर केला बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 05:52 AM2017-09-01T05:52:37+5:302017-09-01T05:52:51+5:30
मंचर : जन्मदात्या पित्याने जिवे मारण्याची धमकी देऊन आपल्या ११ वर्षांच्या मुलीवर वारंवार बलात्कार केल्याची काळिमा फासणारी घटना गुरुवारी उघडकीस आली. खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे बलात्काराची ही घटना घडली असून नराधाम बापाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या नराधम पित्याची ११ वर्षे ५ महीने १७ दिवस वयाची मोठी मुलगी व ९ वर्षांची छोटी मुलगी आहे. या दोन अल्पवयीन मुली खडकवाडी येथे त्याच्या बरोबर राहतात. त्यांच्या आईचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये वडील दारू पिऊन घरी आले. त्याने दरवाजाची कडी लावली आणि मोठ्या मुलीला पाय दाबण्यास सांगत तीच्यावर बलात्कार केला. मुलगी ओरडू नये म्हणून त्याने तीचे तोंड दाबून धरले. तू जर कोणाला काही सांगितले तर तुला मारून टाकीन, अशी धमकी त्याने मुलीला दिली. त्यामुळे ती गप्प राहिली. त्यानंतर तो सातत्याने तीच्यावर अत्याचार करत होता.
सोमवारी रात्री १० वाजता हा नराधम बाप घरी आला. त्याने पुन्हा मुलीवर बलात्कार केला. तीने बापासमोर गयावया केली तरी त्याने न थांबता तिच्यावर अत्याचार सुरूच ठेवले. मुलीच्या ओरडण्याचा आवाज रात्री तिच्या चुलतीने ऐकला होता. मंगळवारी दुपारी चुलतीने तिला विचारले असता या मुलीने भीतीपोटी काहीही सांगितले नाही. मात्र, नंतर तिला त्रास होऊ लागल्याने तिने वडील बलात्कार करत असल्याची माहिती चुलतीला दिल्यावर हा प्रकार उघडकीस आला. या अल्पवयीन मुलीच्या चुलता व चुलतीने ही माहिती रांजणगाव गणपती येथील मुलींच्या मावशीला कळविली. या प्रकरणी मावशीने मंचर पोलिसांत फिर्याद दिली. पोलीसांनी नराधम पित्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.