बलात्कार घटना प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:14 AM2021-09-07T04:14:49+5:302021-09-07T04:14:49+5:30
-डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद ------------------- पुण्यात वारंवार बलात्काराच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलीवर राजरोसपणे असे अत्याचार होणे गंभीर ...
-डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
-------------------
पुण्यात वारंवार बलात्काराच्या घटना घडत आहेत. अल्पवयीन मुलीवर राजरोसपणे असे अत्याचार होणे गंभीर बाब आहे. आरोपी मोकाट सुटतात, म्हणून इतरांचेही धाडस वाढते आणि दुर्दैवी घटनांची पुनरावृत्ती होत राहते. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे. कायद्याची कठोर अंमलबजावणी झाली तरच अशा घटना आटोक्यात येतील. त्यासाठी कठोर आणि लवकरात लवकर कारवाई व्हावी, अशी शासनाला विनंती आहे. अत्याचाराच्या घटना घडल्यानंतरही आरोपींवर किरकोळ गुन्हे दाखल होतात आणि त्यांची सुटकाही होते. सध्या कोणत्याही वयोगटातील महिला सुरक्षित नाहीत. कायद्याचे राज्य राहिलेले नाही. विश्वास कोणावर ठेवायचा, असा प्रश्न उभा राहिला आहे. आरोपी मुले किती वर्षांची आहेत, याचा विचार न करता त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. मुले अल्पवयीन असतील तर त्यांना बालसुधारगृहात पाठवले जातात, गुन्हे कमी केले जातात, कमी कलमे लावली जातात. असे न करता कठोर कारवाई व्हावी.
- मेधा कुलकर्णी, उपाध्यक्ष, राष्ट्रीय महिला मोर्चा, भाजपा
------------------
बलात्काराची घटना अतिशय खेदजनक आणि निंदनीय आहे. समाजाची मानसिकता दिवसेंदिवस भयावह होत चालली आहे. अत्याचाराच्या घटना ऐकून मन सुन्न होते. एखादी महिला, तरुणी माझी झाली नाही म्हणून तिला जाळून टाकणे, मारून टाकणे हा विचार विघातक आणि गंभीर आहे. अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजाची मानसिकता बदलण्याची गरज आहे. घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया येतात, निषेध नोंदवले जातात, कँडल मार्च निघतात. मात्र, घटना घडून नयेत, यासाठी काय केले पाहिजे, याचा विचार आपण एकत्र येऊन करायला हवा. दक्षता कमिटीच्या माध्यमातून आम्ही जनजागृतीचे काम करत आहोत. समाजाने पुढे येऊन याबाबत आणखी काम करण्याची गरज आहे. अशा घटनांमध्ये तपास तातडीने व्हावा, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालावा, यासाठी आग्रह धरला पाहिजे. काही घटनांमध्ये न्याय मिळतोही; मात्र, न्याय न मिळालेल्या प्रलंबित घटनांचे काय? उशिरा मिळालेला न्याय हा अन्यायासारखाच असतो.
- रूपाली चाकणकर, महिला प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस