इंटरनेटमुळे बलात्काराचे होतेय बाजारीकरण : डॉ. नीलम गोऱ्हे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 01:01 PM2019-06-10T13:01:00+5:302019-06-10T13:20:49+5:30
इंटरनेटवर बलात्कार या शब्दाचा शोध घेतला की त्याविषयीचे चित्रपट, व्हिडिओ दिसू लागतात. त्यामधून बलात्कार कसे झाले हे दाखवले जाते...
पुणे : इंटरनेटवरबलात्कार या शब्दाचा शोध घेतला की त्याविषयीचे चित्रपट, व्हिडिओ दिसू लागतात. त्यामधून बलात्कार कसे झाले हे दाखवले जाते. बलात्कार ही फारच गंभीर घटना आहे. इंटरनेटवर हे दाखवणे बंद केले पाहिजे यामुळे त्याचे बाजारीकरण होत आहे, असे मत शिवसेना प्रवक्त्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेत आयोजित ज्योती पुजारी लिखित ‘शेवटाचा आरंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून ज्येष्ठ लेखिका डॉ. अंजली सोमण, अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. मंदा खांडगे, विद्या बुक्स प्रकाशनाचे शशिकांत पिंपळापुरे उपस्थित होते.
गोऱ्हे म्हणाल्या, समाजात बलात्कार म्हटलं की, अरे बापरे ही प्रतिक्रिया येते. आम्ही कोपर्डी प्रकरण, निर्भया प्रकरण, ज्योती चौधरी घटना यांचा मागोवा घेतला. कोर्टातले डावपेच व न्याय प्रवास यांची ओळख पण आम्हाला झाली. या घटना ताज्या असेपर्यंत आंदोलने-मोर्चे निघतात. मात्र, घटना जुनी झाली की, त्याची तीव्रताही कमी होते. मात्र यात यातना सहन कराव्या लागतात त्या पिडीत स्त्रीला. पण बलात्कार म्हणजे शेवट नव्हे. या शेवटातुनच एक नवा आरंभ होत असतो.
डॉ. अंजली सोमण म्हणाल्या, समाजात स्वत:त गुंतलेले अनेक साहित्यिक असतात. मात्र काही लेखक सामाजिक भान जपत समाजातील विकृत घटनांवर लेखन करून प्रश्न मांडत आहेत. समाजात सेक्स विषयीचे अनेक गैरसमज आहेत. हे गैरसमज दूर करणे आणि पुरुषांचा सेक्सकडे बघण्याचा दृष्टिकोन परिपक्व करणे गरजेचे झाले आहे.
डॉ. मंदा खांडगे म्हणाल्या, मागील अनेक वर्षात बलात्काराचे प्रश्न विविध सामाजिक संस्था मांडत आहेत. बलात्कार ही मानसिक विकृती असल्याने त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. यासाठी विविध संघटनांनी एकत्र यायला हवे. पीडित महिलेला वेगळ्या नजरेनी न पाहता तिला मानसिक धैर्य द्यायला हवे. तिच्यावर बेतलेल्या प्रसंगाची तीव्रता असेपर्यंतच आरोपींना शिक्षा होणे गरजेचे आहे. लेखिका ज्योती पूजारी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक शशिकांत पिंपळापुरे यांनी केले. चंचल काळे यांनी सूत्रसंचालन केले.