काळ्या जादूची भीती घालून भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; २० लाख उकळणाऱ्या भोंदूबाबाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 08:52 PM2022-03-12T20:52:56+5:302022-03-12T20:55:30+5:30
२०२० ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला...
पिंपरी : घरावर काळी जादू केली असल्याचे सांगत अघोरी पूजा केली. तसेच महिलेकडून २० लाख रुपये घेतले. त्यानंतर गुंगीचा पदार्थ खायला देऊन महिलेवर बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी भोंदू बाबाला अटक केली. किवळे, मारुंजी तसेच औरंगाबाद जिल्ह्यात ऑक्टोबर २०२० ते १९ जानेवारी २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
विनोद शंकर पवार (वय ३३, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. याप्रकरणी ३८ वर्षीय पीडित महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या घरात वारंवार कटकटी सुरू असल्याचे त्यांनी आरोपी विनोद पवार याला सांगितले. मी जादूटोणा व अघोरी विद्येचे काम करतो. मला तुमच्या घरी येऊन पहावे लागेल, असे म्हणत आरोपी हा पिडीत महिलेच्या घरात आला.
तुमच्या घरावर काळी जादू केली आहे. त्यामुळे तुमच्या घरात रोज कटकटी होतात. तुमचा नवरा सात-आठ महिन्यांपेक्षा जास्त जगणार नाही. त्याकरिता मला तुमच्या घराची बांधणी करून तांत्रिक विधी करावे लागेल, असे म्हणून आरोपीने फिर्यादीकडून ३० हजार रुपये घेऊन अघोरी पूजा केली. त्यानंतर आरोपीने काळ्या जादूची भीती दाखवून महिलेकडून २० लाख रुपये घेतले. गुंगीचा पदार्थ खायला देऊन महिलेवर बलात्कार केला.
पीडित महिलेने पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्याकडे तक्रार केली. खंडणी विरोधी पथकाने चौकशी करून १० मार्चला आरोपीला ताब्यात घेतले. आरोपी पवार याच्या विरोधात यापूर्वी सांगली येथील कुलाप पोलीस ठाण्यात दरोडा आणि वाकड पोलीस ठाण्यात शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अजय जोगदंड, उपनिरीक्षक संगीता गोडे, सहायक फौजदार अशोक दुधवणे, पोलीस कर्मचारी किरण काटकर, प्रदीप गोडांबे, आशिष बोटके, अमर राऊत, प्रदीप गायकवाड, प्रदीप गुट्टे, अनिता जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली.