व्हाट्सअपवर झालेल्या ओळखीतून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील माजी सरपंचाला बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 09:18 PM2022-11-24T21:18:07+5:302022-11-24T21:18:43+5:30
विशेष म्हणजे यातील आरोपी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे गावचा माजी सरपंच
पुणे प्रतिनिधी/किरण शिंदे : व्हाट्सअप वर झालेल्या ओळखीतून सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर 38 वर्षीय व्यक्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कात्रज घाटातील प्रसाद हॉटेलमध्ये हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यातील आरोपी पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नाझरे गावचा माजी सरपंच आहे.
संतोष दत्तात्रय नाजीरकर (वय 38, नाजरे कडेपठार, पुरंदर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोक्सओ ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने तक्रार दिली आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पीडित मुलगी अल्पवयीन आहे. अल्पवयीन असतानाही जून 2021 मध्ये तिचे लग्न झाले होते. मात्र पतीसोबत भांडण झाल्यामुळे सध्या ती आई-वडिलांसोबत राहते. घटस्फोटासाठी तिची कोर्टात केस सुरू आहे. कोंढवा येथील एका महाविद्यालयात पहिल्या वर्षाला ती शिक्षणही घेत आहे.
दरम्यान ऑगस्ट 2022 मध्ये मित्राला व्हाट्सअपवर मेसेज करताना चुकून तिने आरोपी संतोष नाझीरकर यांच्या क्रमांकावर मेसेज केला होता. तेव्हापासून दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्री झाले. नोव्हेंबर महिन्यात दोघे एकत्र भेटले आणि हडपसर परिसरातील एका हॉटेलमध्ये दोघांनी एकत्र जेवणही केले होते. बुधवारी ही तरुणी महाविद्यालयात जाण्यासाठी निघाले असता संतोष याने तिच्या मोबाईलवर फोन केला आणि भेटण्यासाठी बोलावले. त्यावेळी संतोष बोलेरो गाडी घेऊन आला. या तरुणीला त्याने गाडीत बसण्यास सांगितले आणि जेवण करण्यासाठी जाऊयात असे सांगून या तरुणीला कात्रज घाटातील प्रसाद हॉटेल, लॉजमध्ये नेले. त्यानंतर हॉटेलच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत नेऊन जबरदस्ती करत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.
दरम्यान हा सर्व प्रकार सुरू असतानाच या मुलीने हॉटेलमधूनच आईला फोन करून या सर्व प्रकारची माहिती दिली आणि लोकेशनही पाठवले होते. आईनेही लगेच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचे गांभीर्य ओळखून घटनास्थळी धाव घेतली. आरोपी संतोष नाझीरकर याला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.