आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाच्या पाण्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2023 09:16 PM2023-05-17T21:16:05+5:302023-05-17T21:16:18+5:30
पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वात मोठे धरण असून सध्या या धरणात केवळ एकवीस टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला
डिंभे: डिंभे धरणाच्यापाणी साठ्यात झपाट्याने घट होत आहे. आज मितीस या धरणात केवळ २१ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. यामुळे साडेतेरा टीएमसी पाणी साठवण क्षमता आसणाऱ्या या धरणातील पाण्याने तळ गाठला आहे. बाष्पीभवनाद्वारेही पाण्याची उत्सर्जन होत आहे. तर सध्या वीजगृहाद्वारे ५५० कुसेक्स तर सिंचनद्वारे ३०० कूसेक्स असे एकूण ८०० कुसेक्स इतक्या जलद गतीने धरणातून पाणी बाहेर पडत असल्याने दिव्य धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होऊ लागला आहे.
आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागात घोड नदीवर बांधण्यात आलेल्या डिंभे धरणाच्या पाणीसाठ्यात सध्या झपाट्याने घट होत आहे. पाणीसाठ्याच्या दृष्टीने कुकडी प्रकल्पातील हे सर्वात मोठे धरण असून सध्या या धरणात केवळ एकवीस टक्के इतका अत्यल्प पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या धरणाच्या पाणीसाठ्यावरच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पारनेर करमाळा या तालुक्यातील गावे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व शिरूर तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा अवलंबून असतो. यंदा सिंचनासाठी या धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. तर सध्या या धरणातून वीजगृहाद्वारे ५५० कुसेक्स तर सिंचन द्वारे ३०० कुसेक्स असे एकूण ८०० कुसेक्स इतक्या जलद गतीने दररोज धरणातून पाणी बाहेर पडत आहे. यामुळे या धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून दिंडे धरणातील पाणी साठ्याने तळ गाठला आहे.