बाबूजींच्या मैफलीचे दुर्मिळ संचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2018 03:09 AM2018-08-19T03:09:50+5:302018-08-19T03:10:29+5:30
आनंद, कुंदा देशमुख यांनी केले होते डॉक्युमेंटेशन; केवळ कॅमेरा व मायक्रोफोनवर चित्रीकरण
- नम्रता फडणीस
पुणे : बाबूजी ऊर्फ सुधीर फडके म्हणजे मराठी संगीतविश्वातील एक अमूल्य असे रत्न. भावगीत, भक्तिगीत, लावणी या प्रांतातही त्यांच्या स्वरांचा अलौकिक असा सुगंध दरवळला आहे; मात्र ‘गीतरामायण’च्या अजरामर मैफलींव्यतिरिक्त त्यांच्या गाजलेल्या इतर स्वरमैफलींपासून अद्यापही रसिक वंचितच आहेत; परंतु संगीत आणि निवेदन क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असलेल्या आनंद देशमुख आणि त्यांच्या पत्नी कुंदा देशमुख या रसिक दाम्पत्याने बाबूजींच्या पावणे तीन तासांच्या भावगीत, भक्तिगीत आणि लावणीच्या मैफलीचा दुर्मिळ ठेवा स्वत: चित्रीकरण करून जतन केला आहे.
बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या स्वरमैफलीचा हा ठेवा रसिकांना उपलब्ध होणे हा एक अपूर्व योगच म्हणावा लागेल. नंद नंदन प्रतिष्ठान आणि श्रीकृष्ण ध्यानमंदिर यांच्या वतीने ध्यानमंदिराचे संस्थापक बाबा देशपांडे यांचा शंभरावा वाढदिवस आणि बाबूजींच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून आनंद देशमुख आणि कुंदा देशमुख यांनी ‘जुळल्या सगळ्या त्या आठवणी’ या कार्यक्रमाद्वारे या दुर्मिळ ठेव्याचे दर्शन रसिकांना घडविले. या अमूल्य ठेव्याविषयी आनंद देशमुख म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर चित्रपट निर्मिती करण्यासाठी बाबूजींनी लोकसहभागातून निधी संकलित करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी रमणबाग येथे चार दिवसांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. त्यामध्ये स्वत: संगीतबद्ध केलेली आणि गायलेली भावगीते, गाणी, आणि लावणी बाबूजी सादर करणार होते. या संपूर्ण कार्यक्रमाच्या डॉक्युमेंटेशनची जबाबदारी बिंदुमाधव जोशी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, बाबूजी यांनी आमच्या दोघांवर सोपविली होती; पण ऐनवेळी बाबूजींचा आवाज बसला. त्यांना गाता येणे शक्य नव्हते. तेव्हा त्यांनी पंडित भीमसेन जोशी यांना कार्यक्रमात गाण्याची विनंती केली. पंडितजींनी त्यांच्या विनंतीला मान दिला; मात्र त्या वेळी बाबूजी रसिकांना म्हणाले की, मी तुमच्यासाठी सुगम संगीत मैफल पुन्हा सादर करेन; मात्र कोणतेही पैसे घेणार नाही. तो दिलेला शब्द बाबूजींनी पाळला आणि १५ नोव्हेंबर १९८६ रोजी पुन्हा स्वरमैफल केली.
हे दुर्मिळ धन नष्ट होता होता वाचले...
या मैफलीच्या संपूर्ण चित्रीकरणाची व्हीएचएस टेप आम्ही बनवली होती. जेव्हा ही व्हीएचएस टेप कपाटातून बाहेर काढून आम्ही व्हीसीआरमध्ये घालून पाहिली, तर चित्र दिसत नव्हते. पुन्हा ती कॅसेट बाहेर काढून पाहिली, तर त्यावर बुरशी आली होती. आमच्या काळजाचा ठोकाच चुकला. आमचे कष्ट पाण्यात गेले त्याहीपेक्षा हे अमूल्य धन नाहीसे होईल, अशी भीती वाटली.
म्हणतात ना देव पाठीशी असेल तर काही होत नाही. पूर्वी व्हीएचएस टेपचा व्यवसाय केला जायचा. त्या टेप बाजारात मिळायच्या, रुग्णालयांना अधिकांश या टेप लागायच्या. टेस्ट केल्या की ती टेप रुग्णाला दिली जायची, आता सीडी दिली जाते. त्या दोन ते तीन मिनिटांच्या टेप तयार करण्याचे काम आमच्या ओळखीतली एक मुलगी करीत होती, त्यामुळे तिला ते तंत्रज्ञान माहीत होते.
तिने १२०० मीटरची टेप कापसाच्या बोळ्याने हळुवारपणे पुसून काढली. तीन दिवस ती हे काम करीत होती. त्यानंतर ती टेप व्हिसीआरमध्ये टाकली आणि सुंदर चित्र दिसायला लागल्यानंतर, आमचा जीव भांड्यात पडला. या टेपचे आता डिजिटलमध्ये आम्ही रूपांतर केले आहे. एकप्रकारे हा बाबूजींचा आशीर्वाद असल्याचे आनंद देशमुख यानी सांगितले.