ऐतिहासिक शिमला परिषदेचे दुर्मिळ फुटेज एनएफएआयच्या खजिन्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2019 09:40 PM2019-08-14T21:40:08+5:302019-08-14T21:40:46+5:30
देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी हा अमूल्य ठेवा उपलब्ध होणे ही भारतवासियांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे.
पुणे : देशाच्या स्वातंत्र्यापूर्वीच्या महत्त्वपूर्ण घडामोडींच्या दुर्मिळ चित्रणाची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या खजिन्यात भर पडली आहे. देशाच्या ७३ व्या स्वातंत्र्यदिनी हा अमूल्य ठेवा उपलब्ध होणे ही भारतवासियांसाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरली आहे. १९४५ मध्ये झालेल्या ऐतिहासिक शिमला परिषदेचे हे बारा मिनिटांचे दुर्मिळ चित्रीकरण असून, रॉयल इंडिया नेव्हल ऑफिसर विल्यम ग्लेडहिल टेलर यांनी ८ एमएम या रिळप्रकारात केलेले हे चित्रण विल्यम टेलर यांची कन्या मागार्रेट साऊथ यांनी संग्रहालयाला जतनासाठी दिले आहे.
परिषदेसाठी जमलेले राष्ट्रपिता महात्मा गांधी, मौलाना आझाद, सी. राजगोपालचारी, महम्मद अली जिन्ना, राजेंद्र प्रसाद, भुलाभाई देसाई, मास्टर तारा सिंग, जी बी पंत असे अनेक दिग्गज नेते या चित्रणामध्ये दिसत आहेत. मागार्रेट साऊथ यांनी हे रिळ उदात्त भावनेने संग्रहालयाला दिल्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. या रिळमुळे संग्रहालयात महत्त्वाची भर पडली असल्याचे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी बुधवारी सांगितले.
टेलर यांनी ब्रिटिश इंडिया कंपनीमध्ये वयाच्या १७ व्या वर्षी १९३९ मध्ये प्रवेश केला. महायुद्धानंतर ते नौदलात दाखल झाले. टेलर उत्कृष्ट छायाचित्रकार होते. त्यांच्याकडे ८ एमएमचा कॅमेरा होता. टेलर या सर्व दिग्गज नेत्यांची छबी टिपण्यात यशस्वी ठरले. ऐतिहासिक सिमला परिषद २५ जून ते १४ जुलै १९४५ दरम्यान शिमला येथे आयोजित करण्यात आली होती. परिषदेच्या आधी लॉर्ड वेव्हलला भेटलेले महात्मा गांधी बैठकीनंतर परत जाताना या चित्रीकरणात दिसत आहेत. शिमला टेलर यांचे आवडते ठिकाण होते. २०१० मध्ये त्यांचे निधन झाले. भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या क्षणांचे जतन व्हावे, असे मागार्रेट साऊथ यांनी संग्रहालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. दरम्यान, कोणाकडे दुर्मिळ साहित्य असेल तर संग्रहालयाकडे जतनासाठी द्यावे, असे आवाहन मगदूम यांनी केले आहे.