पुण्यातील वेताळ टेकडीवर दुर्मिळ छोट्या कोकिळचे दर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 06:30 PM2021-10-05T18:30:06+5:302021-10-05T18:32:44+5:30
पुणे जिल्ह्यात नर प्रजातीचे पहिल्यांदाच नोंद, हिवाळ्यात राहतात श्रीलंकेत
पुणे : पुण्यातील पक्षीमित्रांचे नंदनवन असलेल्या भांबुर्डा वनविहारात (वेताळ टेकडी परिसर) रविवारी अत्यंत दुर्मिळ अशा छोटा कोकीळ (Lesser Cuckoo, शास्त्रीय नाव: Cuculus poliocephalus) पक्ष्याने दर्शन झाले आहे. हा नर छोटा कोकीळ असून, ही पुणे जिल्ह्यातील पहिलीच नोंद आहे. त्यामुळे वेताळ टेकडीवरील जैवविविधता संपन्नतेचे हे एक उदाहरणच आहे.
हिचे इतर कोकीळ जातीच्या पक्ष्यांशी साधर्म्य असून, दाट झाडीत राहणारा पक्षी आहे. त्यामुळे त्याची ओळख पटवणे फारच अवघड असते. तिचे अन्न मुख्यतः इतर कोकीळ प्रजातींसारखाच सुरवंट व इतर किडे आहे. त्याचे भडक काळे बुबुळ, टोकदार चोच, छातीवरील गडद रेषा, लहान आकार व passage migrant असल्याने इतर कोकीळ प्रजातींपासून हा पक्षी वेगळा ठरतो. हा पक्षी passage migrant असून, हिमालयात प्रजनन करणारे हे छोटे कोकीळ पक्षी हिवाळ्यात भारतीय द्वीपकल्पातून प्रवास करून श्रीलंकेत जाऊन राहतात. ह्या प्रवासात दाट झाडीचे प्रदेश / जंगले पाहून तिथे थोडी विश्रांती घेऊन पुढचा प्रवास करतात. ह्यामुळे सुद्धा हा पक्षी ह्या प्रवासाच्याटप्प्यांमध्ये दिसणे दुर्मिळच आहे.
नराचे दर्शन होणे दुर्मिळच
भांबुर्डा वनविहारात छोटा कोकिळच्या सोईची दाट झाडी असल्यामुळे हा पक्षी इथे थांबतो. रविवारी सकाळी छोटा कोकीळची मादी काही छायाचित्रकारांना दिसली होती. त्यामुळे अविनाश शर्मा, अद्वैत चौधरी व शैलेश देशपांडे ह्यांनी ह्या परिसरात तोच पक्षी शोधण्याची मोहीम हाती घेतली. रविवारी संध्याकाळी अशाच दाट झाडीत हा नर छोटा कोकीळ त्यांच्या दृष्टीस पडला. ह्या पक्षाच्या मादीचे दर्शन होणे जितके कठीण, त्याहून अनेक पट ह्याच्या नराचे दर्शन होणे दुर्मिळ आहे.
''पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेलं भांबुर्डा वनविहार किती निसर्गसंपन्न आणि संवेदनशील भाग आहे हेच ह्या नोंदीतून दिसून येते. हीच निसर्गसंपन्नता जपण्यासाठी वेताळ टेकडी चे संवर्धन होणे गरजेचे आहे असे पक्षी अभ्यासक अद्वैत चौधरी यांनी सांगितले.''