बाळाच्या पोटातील ट्युमरची दुर्मिळ शस्त्रक्रिया यशस्वी
By Admin | Published: July 8, 2017 02:58 AM2017-07-08T02:58:56+5:302017-07-08T02:58:56+5:30
महिला २६ आठवड्यांची गर्भवती असताना बाळाच्या पोटात ट्युमर असल्याचे लक्षात आले. या धक्क्याने पती-पत्नी घाबरले होते. मात्र, डॉक्टरांनी
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महिला २६ आठवड्यांची गर्भवती असताना बाळाच्या पोटात ट्युमर असल्याचे लक्षात आले. या धक्क्याने पती-पत्नी घाबरले होते. मात्र, डॉक्टरांनी दिलासा दिला. प्रसूती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी लॅप्रोस्कोपीच्या साह्याने बाळाच्या पोटातील ट्युमर यशस्वीरीत्या काढण्यात आला... जहांगीर रुग्णालयात पुण्यातील ही पहिलीच दुर्मिळ शस्त्रकिया नुकतीच पार पडली. बालरोगतज्ज्ञ डॉ. दसमीतसिंग आणि भूलतज्ज्ञ डॉ. समीर भोसले यांनी ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
वडगावशेरी येथील २४ वर्षीय महिला गर्भवती होती. गर्भधारणेच्या २६व्या आठवड्यात केलेल्या सोनोग्राफीमध्ये बाळाच्या पोटात ट्युमर असल्याचे लक्षात आले. गर्भलिंगनिदान कायद्यानुसार, विसाव्या आठवड्यानंतर गर्भपात शक्य नसल्याने, आता काय होणार, असा प्रश्न पती-पत्नींसमोर उभा राहिला होता. प्रसूतीनंतर बाळाच्या पोटातील ट्युमर काढता येऊ शकतो, याबाबत डॉक्टरांनी दाम्पत्याला दिलासा दिला. १४ जून रोजी महिलेने गोंडस मुलीला जन्म दिला. १५ जून रोजी लॅप्रोस्कोपी करून बाळाच्या पोटातील ५ सेंटिमीटरचा ट्युमर पोटात हवा भरून काढण्यात आला.
ट्युमर अंडाशयाला चिकटलेला असल्याने एक अंडाशय काढून टाकण्यात आले. ही शस्त्रक्रिया दीड-दोन तास चालली. नवजात बालकाला भूल देणे जोखमीचे असते. मात्र, डॉ. भोसले यांनी ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. या शस्त्रक्रियेसाठी अद्ययावत उपकरणांचा वापर करण्यात आला. नवजात बालकावर शस्त्रक्रिया करायची असल्याने ३-५ एमएमचा छोटा पोर्ट करण्यात आला.
याबाबत ‘लोकमत’शी बोलताना डॉ. भोसले म्हणाले, ‘‘प्रौढ व्यक्तींच्या तुलनेत बाळाला भूल देणे जोखमीचे असते. ही प्रक्रिया अतिशय गुंतागुंतीची असते. अद्ययावत उपकरणांचा वापर करून शस्त्रक्रिया पार पाडता आल्याचे समाधान वाटते. अशा प्रकारची पुण्यातील ही पहिलीची शस्त्रक्रिया आहे. शस्त्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर असून २० जूनला आई आणि बाळाला घरी सोडण्यात आले.’’
डॉ. दसमीतसिंग म्हणाले, ‘‘ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आम्ही वैद्यकीय संशोधनाचा, साहित्याचा सखोल अभ्यास केला. ट्युमर अंडाशयाला जोडला गेलेला असल्याने आतड्यावर दाब निर्माण होण्याची भीती होती. बाळाचा जन्म झाल्यानंतर तपासणी केल्यावर ट्युमरमुळे आतड्याला कोणतीही इजा झाली नसल्याचे लक्षात आले. जन्मानंतर दोन-तीन दिवस वाट पाहिली असती, तर बाळाच्या जिवाला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे जन्मानंतर तातडीने दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करण्यात आली. भविष्यात बाळाच्या आरोग्याबाबत कोणतीही गुंतागुंत निर्माण होणार नाही.’’