‘एनएफएआयए’च्या संग्रहात गजानन जागीरदार यांच्या दुर्मीळ छायाचित्रांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:28 AM2020-12-15T04:28:56+5:302020-12-15T04:28:56+5:30

पुणे : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते गजानन जागीरदार यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रांच्या अमूल्य ठेव्याची राष्ट्रीय चित्रपट ...

Rare photographs of Gajanan Jagirdar in NFAIA's collection | ‘एनएफएआयए’च्या संग्रहात गजानन जागीरदार यांच्या दुर्मीळ छायाचित्रांची भर

‘एनएफएआयए’च्या संग्रहात गजानन जागीरदार यांच्या दुर्मीळ छायाचित्रांची भर

Next

पुणे : ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते गजानन जागीरदार यांच्या जीवनावर आधारित दुर्मीळ छायाचित्रांच्या अमूल्य ठेव्याची राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) खजिन्यात भर पडली आहे. जागीरदार यांचे पुत्र अशोक यांनी सुमारे १३० छायाचित्रे आणि इतर साहित्य हे संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपुर्द केले आहे.

१९५३ सालच्या ‘महात्मा’ चित्रपटात गजानन जागीरदार यांनी नायकाची भूमिका साकारली होती. त्यावेळी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांचे काढलेले मूळ रेखाचित्र या संग्रहात समाविष्ट आहे. या चित्रपटाचे लेखन पु. ल देशपांडे व दिग्दर्शन दत्ता धर्माधिकारी यांनी केले होते. याशिवाय चित्रपटातील अभिनेत्री रेखा आणि कलाकार डेव्हिड अब्राहम यांच्यासोबतच्या जागीरदार यांच्या अनेक छायाचित्रांचाही यात समावेश आहे.

जागीरदार प्रभात स्टुडिओची निर्मिती असलेल्या एका चित्रपटात लोकमान्य टिळकांची भूमिका साकारणार होते. मात्र काही कारणास्तव हा चित्रपट पूर्ण होऊ शकला नाही. परंतु त्यांचे लोकमान्य टिळक यांच्या वेशभूषेतील कृष्णधवल दुर्मीळ छायाचित्र रसिकांना पाहाता येईल. १९३८ मधील ‘मीठा जहर’ मध्ये साकारलेली ‘नसीम बानू’ आणि प्रभात स्टुडिओच्या १९४४ मधील ‘रामशास्त्री’ चित्रपटातील अजरामर भूमिकेतील छायाचित्रे देखील या संग्रहात आहेत.

याविषयी प्रकाश मगदूम म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ज्येष्ठ कलाकाराची दुर्मीळ छायाचित्रे आमच्या संग्रहात आल्याचा आनंद आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात प्रभात स्टुडिओच्या माध्यमातून केली. फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडियाचे (एफटीआयआय) १९६१-६२ मध्ये ते प्राचार्य होते. त्यांची छायाचित्रे संग्रहात आल्यामुळे दोन्ही संस्थांचा मेळ पुन्हा एकदा साधला गेला आहे. ही छायाचित्रे डिजिटाईज करून लवकरच संशोधक व अभ्यासकांना उपलब्ध करून दिली जातील.

----------

Web Title: Rare photographs of Gajanan Jagirdar in NFAIA's collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.