दुर्मिळ चित्रफितींचे पुन्हा दर्शन
By admin | Published: July 8, 2017 03:00 AM2017-07-08T03:00:41+5:302017-07-08T03:00:41+5:30
भारतीयांना सर्वप्रथम ज्या चित्रफितींनी या माध्यमाची ओळख करून दिली त्या ‘ल्युमिअर ब्रदर्स’च्या चित्रफितींसह अनेक जुन्या आणि दुर्मिळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारतीयांना सर्वप्रथम ज्या चित्रफितींनी या माध्यमाची ओळख करून दिली त्या ‘ल्युमिअर ब्रदर्स’च्या चित्रफितींसह अनेक जुन्या आणि दुर्मिळ चित्रफिती पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. ‘ल्युमिअर ब्रदर्स’नी २८ डिसेंबर १८९५ मध्ये पॅरिसमध्ये पहिल्यांदा चित्रपट दाखवला होता. त्यानंतर ७ जुलै १८९६ मध्ये ल्युमिअर बंधूंबरोबर काम करणाऱ्या मारिअस सेस्टिअर यांनी मुंबईत वॅटसन हॉटेलमध्ये चित्रफिती दाखवल्या. देशातील ते पहिलेच चित्रपट प्रदर्शन ठरले. त्याचे स्मरण म्हणून राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या (एनएफएआय) चित्रपटगृहात आज (८ जुलै) सायंकाळी पाच वाजता जुन्या चित्रफिती दाखवल्या जाणार आहेत. हा कार्यक्रम नागरिकांसाठी विनामूल्य खुला आहे. ल्युमिअर बंधूंच्या पाच चित्रफिती यात असून ब्रिटिशांनी १९११मध्ये दिल्लीत भरवलेल्या ‘दिल्ली दरबार’ या राजकीय महासभेची दुर्मिळ दृश्येही बघायला मिळणार आहेत.
भारतावर राज्य करत असताना ब्रिटिशांनी भारताला अत्याधुनिक सुविधा दिल्याची नोंद इतिहासात पाहायला मिळते. ‘ल्युमिअर्स ब्रदर्स’ या परदेशी नागरिकांनी भारतात पहिली फिल्म दाखवली. या घटनेला १२१ वर्षे पूर्ण होत असल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १२१ वर्षांपूर्वी जेव्हा ही चित्रफीत ल्युमिअर्स ब्रदर्स यांनी दाखविली, त्या वेळी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. काही जण घाबरले आणि काही जण अक्षरश: ओरडत सुटले. कारण, चित्रपटातील रेल्वे आपल्या अंगावर येत आहे आणि त्यापासून वाचण्यासाठी प्रेक्षकांची धांदलच उडाली होती, असे सांगितले जाते.
याबाबत चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले, ‘दिल्लीत ब्रिटिशांनी १८७७, १९०३ व १९११ असे तीन दरबार भरवले होते. कोरोनेशन पार्कमध्ये १२ डिसेंबर १९११ रोजी तिसरा दिल्ली दरबार भरला होता. राजा पंचम जॉर्ज व क्वीन मेरी या वेळी उपस्थित होते.
बलोनिया संग्रहालयाकडूनही चित्रफीत
या दरबारामध्ये कोलकताऐवजी दिल्ली ही ब्रिटिशांची राजधानी करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार्ल्स अर्बन यांनी या सोहळ्याचे केलेले चित्रीकरण लंडन येथे १२ फेब्रुवारी १९१२ रोजी दाखवण्यात आले होते. इटलीतील बलोनिया येथील संग्रहालयाकडून ही पाच मिनिटांची चित्रफीत संग्रहालयाला मिळाली असून, ती रसिकांना दाखवली जाणार आहे. यातील काही चित्रफिती ३५ एमएम प्रकारातील असतील.