दुर्मीळ कासवं विमानाने निघाली आपल्या हक्काच्या गावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:13 AM2021-08-13T04:13:16+5:302021-08-13T04:13:16+5:30
पुणे : तस्करीमध्ये सापडलेली कासवं आता आपल्या हक्काच्या घरी म्हणजेच अधिवासामध्ये पुण्यातून थेट विमानाने गुरुवारी (दि.१२) निघाली आहेत. दुर्मीळ ...
पुणे : तस्करीमध्ये सापडलेली कासवं आता आपल्या हक्काच्या घरी म्हणजेच अधिवासामध्ये पुण्यातून थेट विमानाने गुरुवारी (दि.१२) निघाली आहेत. दुर्मीळ असणारी ही कासवं पुण्यातून लखनऊच्या रेस्क्यू सेंटरमध्ये जात असून, तिथे काही दिवस वातावरणाशी एकरूप झाले की, आसाममधील गुवाहाटीला त्यांचं शेवटचं ‘डेस्टिनेशन’ असणार आहे.
वन विभागाला २५ मे रोजी चेन्नईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेमध्ये हे प्राणी असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाने कासवं, इग्वाना आणि फायटर मासे जप्त केली होती. हे सर्व प्राणी बावधन येथील क्यू रेस्क्यू सेंटरमध्ये योग्य वातावरणात देखरेखीखाली ठेवली होती. या वेळी मुख्य वन संरक्षक सुजय दोडल, क्यू रेस्क्यू टीमच्या संचालक नेहा पंचमिया आदी उपस्थित होते.
इंडियन हरपेटॉलॉजिकल सोसायटी, कात्रज यांच्याकडे ५५ दुर्मीळ कासवे होती, तर रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट, बावधन यांच्याकडे ८ होती, अशी एकूण ६३ कासवे आज विमानाने त्यांच्या गावाकडे रवाना झाली. या कासवांची संपूर्ण तपासणी करून त्यांना पाठविले आहे.
उपवनसंरक्षक राहुल पाटील म्हणाले, ‘‘ही दुर्मीळ कासवं असून, वन्यजीव संरक्षक कायद्यानुसार संरक्षित आहेत. कासवांच्या इंडियन रूफ टर्टल, क्राऊन्ड रिव्हर टर्टल, ब्राऊन रूफ टर्टल आणि स्पॉटेड रिव्हर टेरीपिन जातीची ही कासवं होती.’’
———————————-
‘कासवांना त्यांच्या अधिवासात सोडण्यासाठी विमानाने पाठविण्याची ही घटना प्रथमच महाराष्ट्रात वन विभागाकडून होत आहे. आज पुण्यातून ही कासवं गुवाहाटीला जात असून, तिथे आसामची वन्यजीव टीम त्यांना ताब्यात घेईल.’
- राहुल पाटील, उपवनसंरक्षक
——————————-
प्रत्येकाचा एक अधिवास असतो. त्याच ठिकाणी ते चांगल्याप्रकारे जगू शकतात. आपल्याकडे ही कासवं निसर्गात जगू शकली नसती, ती आपल्याकडे कैद असल्यासारखी राहिली असती. म्हणून आम्ही त्यांना त्यांच्या गावी पाठवत आहोत.
- विवेक खांडेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
———————