जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 04:27 AM2021-02-20T04:27:09+5:302021-02-20T04:27:09+5:30

पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त ...

Rare treasure from Jaishankar Danve | जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना

जयशंकर दानवे यांच्याकडील दुर्मिळ खजिना

Next

पुणे : सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक जयशंकर दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहातील चित्रपटविषयक माहितीचा दुर्मिळ खजिना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला प्राप्त झाला आहे. दानवे यांच्या कुटुंबीयांनी नुकताच कोल्हापूर येथे हा दुर्मिळ ठेवा राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांच्याकडे सुपूर्द केला.

मराठीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टी गाजविणारे जयशंकर दानवे हे प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक होते. पुण्यात जन्मलेले दानवे यांनी अगदी सुरुवातीला मराठी आणि उर्दू नाटकांमध्ये कामे केली आणि त्यानंतर १९३० च्या सुमारास कोल्हापूर येथे चित्रपटमहर्षी भालजी पेंढारकर यांच्याकडे सहदिग्दर्शक म्हणून काम करण्यास प्रारंभ केला. आपल्या पाच दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत दानवे यांनी असंख्य मराठी चित्रपट आणि नाटकांमधून कामे केली.

ज्येष्ठ अभिनेते पृथ्वीराज कपूर आणि राज कपूर या दोघांचीही भूमिका असलेल्या ''वाल्मिकी'' ( १९४६) या चित्रपटातही दानवे यांनी काम केले होते.

दानवे यांच्या वैयक्तिक संग्रहात असंख्य दुर्मिळ छायाचित्रे, हॅंडबिल्स, गाण्यांच्या पुस्तिका, वृत्तपत्रीय कात्रणे, त्यांच्यावर आलेले लेख, जुनी कागदपत्रे,

अनेक पुस्तके, त्याच्या हस्ताक्षरात लिहिलेली काही नाटके तसेच ते काम करीत असलेल्या हॅम्लेट (१९३३) या नाटकातील काही विग्ज, मिशा आदी वस्तूंचाही समावेश आहे. त्यांच्या संग्रहातील छायाचित्रे प्रामुख्याने कृष्णधवल असून सुमारे २५० छायाचित्रे दानवे यांनी अभिनेत केलेल्या चित्रपट आणि नाटकांमधील आहेत. याशिवाय त्यांच्या समकालीन इतर अभिनेत्यांची ५१ छायाचित्रे आहेत. याशिवाय त्यांनी भूमिका केलेल्या चित्रपट आणि नाटकातील १५ बाय १२ आकाराच्या सुमारे चाळीस मोठ्या फ्रेम्सही आहेत.

दानवे कुटुंबीयांनी मोठ्या परिश्रमाने जतन करून ठेवलेला हा दुर्मिळ संग्रह राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाला दिल्याबद्दल आनंद व्यक्त करताना राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम म्हणाले की, भारतीय चित्रपटसृष्टीतील एका ''युगा'' तील एका ज्येष्ठ अभिनेता आणि दिग्दर्शकाचा हा संग्रह मिळाल्यामुळे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयातील खजिना आणखी समृद्ध झाला असून त्याचा संशोधकांना खूप उपयोग होणार आहे.’’

Web Title: Rare treasure from Jaishankar Danve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.