५८ वर्षांनी दुर्मिळ योग

By admin | Published: July 17, 2015 03:50 AM2015-07-17T03:50:31+5:302015-07-17T03:50:31+5:30

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा अधिक मासामुळे १ लाख जादा वारकरी भाविक सहभागी झाले आहेत. कुंभमेळा, रमजान ईद, अधिक मास आणि पालखी सोहळ्याचा दुर्मिळ योग ५८ वर्षांनी आला आहे.

Rare Yoga after 58 years | ५८ वर्षांनी दुर्मिळ योग

५८ वर्षांनी दुर्मिळ योग

Next

बारामती : संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदा अधिक मासामुळे १ लाख जादा वारकरी भाविक सहभागी झाले आहेत. कुंभमेळा, रमजान ईद, अधिक मास आणि पालखी सोहळ्याचा दुर्मिळ योग ५८ वर्षांनी आला आहे. यापूर्वी १९५७ मध्ये हा योग आला होता, अशी माहिती पालखी सोहळाप्रमुख सुनील महाराज मोरे यांनी सांगितली.
यंदा पालखी सोहळ्यात ३३० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. तसेच, सोहळ्यालादेखील ३३० वर्षे पूर्ण झाली.
यंदा पालखी सोहळ्यात प्रथमच वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, वनविभाग आदी संस्थांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यासाठी रोपे बियांची लागवड करून ३ लाख झाडे पालखी मार्गावर लावण्यात येत आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ही झाडे लावण्यात येणार आहेत.
यंदा प्रथमच ‘स्वच्छ वारी, सुंदर वारी, हरित वारी’चा उपक्रम राबविण्यात येत आहे. या संकल्पनेनुसार दिंडीतील कोणताही वारकरी प्लॅस्टिक वापरणार नाही. जेवणासाठी या वारकरी भाविकांना स्टीलची ताटे देण्यात आली आहेत. त्यामुळे थर्माकोल, प्लॅस्टिकच्या पत्रावळ्या, द्रोण आदींचा हानीकारक कचरा टाळता येणार आहे. शिल्लक अन्न खड्डा खोदून त्यात टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चांगली स्वच्छता राखण्यास मदत होईल. शिवाय जनावरांना असे फेकून दिलेले अन्न खाल्ल्याने होणाऱ्या विषबाधेची भीती राहणार नाही. (प्रतिनिधी)

मुक्कामी स्वच्छता करणारी युवक दिंडी
यंदा सोहळ्यात २०० युवक ‘स्वच्छ दिंडी’त सहभागी झाले आहेत. पुणे परिसरातील हे युवक आहेत. पालखी सोहळा मुक्काम संपल्यानंतर मार्गस्थ होतो. या वेळी या दिंडीतील युवक पाठीमागे थांबून मुक्कामाच्या गावातील स्वच्छता करतात. पालखी मार्गावरील मुक्कामाच्या प्रत्येक गावाची स्वच्छता या युवकांची दिंडी करणार आहे. त्यामुळे रोगराई दूर ठेवण्यास मदत होणार आहे.

Web Title: Rare Yoga after 58 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.