रासाईदेवी यात्रा : दोन गटांत हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 03:11 AM2018-04-03T03:11:07+5:302018-04-03T03:11:07+5:30
नानगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत रासाईदेवीच्या यात्रेत दोन गटामध्ये तुंबळ मारामारी झाली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
केडगाव - नानगाव (ता. दौंड) येथील ग्रामदैवत रासाईदेवीच्या यात्रेत दोन गटामध्ये तुंबळ मारामारी झाली. दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या घटनांमध्ये पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले आहेत.
पहिल्या घटनेमध्ये नानगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत खळदकर यांनी मारहाण झाल्याची तक्रार दिली आहे. खळदकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यात्रेमध्ये मंगला बनसोडे तमाशा सुरू असताना आरोपी रविवारी पहाटे पावणेदोनच्या सुमारास तमाशासमोर लोकांमध्ये
उभे राहून नाचत होते. खळदकर यांनी आरोपींना गोंधळ घालू नका, असे सांगितले. त्यावरून आरोपींनी त्यांना शिवीगाळ, दमदाटी करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
पोलिसांनी अक्षय सुरेश खळदकर, अभिजित संजय खळदकर, गणेश महादेव जाधव, गोट्या प्रकाश जाधव, महादेव आनंदा जाधव, सागर माकर (सर्व रा. नानगाव, ता. दौंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अक्षय सूर्यकांत खळदकर (रा. अमोणीमाळ, नानगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी राजेंद्र चंद्रकांत खळदकर, विनोद पांडुरंग खळदकर, प्रमोद पांडुरंग खळदकर, दिलीप बाबूराव खळदकर, नाना खळदकर, गौरव दिलीप खळदकर (सर्व रा. नानगाव, ता. दौंड) हे रविवारी पहाटे दोनच्या सुमारास नानगाव येथे बेकायदा जमाव जमवून फिर्यादीस तू तमाशामध्ये झालेल्या भांडणात का आलास? अशी विचारणा करीत त्यांच्या घरात घुसून गजाने व काठीने मारहाण केली. यापैकी एका आरोपीने फिर्यादीच्या नातलगाचा विनयभंग केला.
यातील आरोपी सरपंच खळदकर यांच्या कुटुंबातील आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जितेंद्र पानसरे व सचिन यादव करत आहेत.
नानगावचा तमाशा व वाद यांची परंपरा कायम
तमाशात नाचण्याच्या कारणावरुन गावातील युवकांनी गावच्या माजी सरपंचांना मारहाण केल्याची घटना चार वर्षांपूर्वी घडली होती. या वेळच्या घटनेतही विद्यमान सरपंच चंद्रकांत खळदकर यांना मारहाण झाली आहे. भविष्यात गावातील यात्रेमध्ये तमाशाबंदी करून सामाजिक कामे करावीत, अशी मागणी गावातील सामान्य नागरिकांनी केली आहे.