‘रासेयो’चा स्वयंसेवक बनला आरोग्यदूत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:09 AM2021-06-03T04:09:31+5:302021-06-03T04:09:31+5:30
स्थानिक स्वराज्य संस्था ते महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या मदतीला ‘रासेयो’चे स्वयंसेवक धावले. त्यांनी रात्रंदिवस काम केले. जात-पात-धर्म असा भेदभाव ...
स्थानिक स्वराज्य संस्था ते महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या मदतीला ‘रासेयो’चे स्वयंसेवक धावले. त्यांनी रात्रंदिवस काम केले. जात-पात-धर्म असा भेदभाव न करता कोरोनाने मृत्यू पावलेल्या वारस-बेवारस व्यक्तींची अंत्यविधीची प्रक्रिया अनेक विद्यार्थ्यांनी मोठ्या धीराने आणि धाडसाने पार पाडली. असहाय कुटुंबे दत्तक घेऊन धनधान्य पुरवले आणि लॉकडाऊन काळात सैरभैर आणि हवालदिल झालेल्या निर्वासित छावण्या आणि मोलमजुरी करणारे स्थलांतरित रस्ते तुडवत होते. त्यावेळी सेवाभावी संस्था आणि स्थानिकांना सोबत घेऊन त्या सर्वांना निवारा आणि पोटापाण्याची सोय करणारे कोविड योद्धे ‘रासेयो’चेच आजी-माजी विद्यार्थी होते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेने कोरोना महामारीच्या मागील सव्वा वर्षांच्या काळात ‘रासेयो’ स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी, विभाग व जिल्हा समन्वयक, प्राचार्य यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्वच आघाड्यांवर कार्य केले. एका विद्यार्थ्याने किमान दहा कुटुंबांना दत्तक घ्यायचे आणि त्यांच्या आरोग्य व दिनचर्येची काळजी घायची, हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम राबविला. कोरोना महामारीच्या सुरुवातीच्या काळात अशा प्रबोधनाची आणि कुटुंबांप्रती संवेदनशील असण्याची खूप गरज होती. सहा लाख कुटुंबांपर्यंत रासेयो स्वयंसेवक पोहोचले. विद्यार्थ्यांचे सामाजिक भान प्रगल्भ होणे आणि सर्वसामान्य कुटुंबांचा रासेयोला कृतज्ञतेचा आधार मिळणे या गोष्टी मोठ्या प्रमाणात याच काळात घडल्या. पाच लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत आरोग्यसेतू ॲप पोहोचवले. तसेच ८० हजार रक्तदात्यांची रक्तगटासह सूची बनवली आणि स्थानिक पातळ्यांवरील रक्तपेढ्यांना वितरीत केली. तब्बल ५० लाखांहून अधिक मास्क बनवून ते वितरीत करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे एकमेव विद्यापीठ ठरले. १५ हजार लिटर सॅनिटायझरची निर्मिती हीदेखील उपलब्धी सुरुवातीच्या काळात महत्त्वाची ठरली.
अनेक महाविद्यालयांनी कोरोना काळात दोन-तीन आठवडे दोन्ही वेळचे जेवण तयार करून गरजूंना पुरवले. या काळात विद्यापीठाचे कुलगुरू, इतर अधिकारी आणि विद्यार्थी उपक्रम समितीने वारंवार बैठका घेऊन विद्यार्थ्यांना, कार्यक्रम अधिकाऱ्यांना प्रोत्साहीत केले. तसेच निधी उपलब्ध करून दिला. देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी केलेल्या सार्थ आवाहनांना तितकाच तत्काळ प्रतिसाद देऊन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ते आज ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ अशा व्यापक कोरोनामुक्ती अभियानाकडे रासेयो विभाग चालला आहे.
पोलीस, स्थानिक प्रशासकीय कार्यालये, महानगरपालिका यांच्या प्रत्येक नियोजनात सावित्रीबाई फुले विद्यापीठाने सक्रिय भाग घेतला. सुरक्षित अंतर ठेवण्यासाठी मदत, आरोग्य केंद्रे आणि विलगीकरण कक्षात स्वयंसेवक म्हणून काम करणे, कोरोनाग्रस्तांची नोंद आणि पोलीस कार्यालयात चौकशीसाठी येणाऱ्या गरजूंच्या नाशिक, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील नोंदींसाठी मदत ही त्या काळात महाराष्ट्राच्या प्रशासनाला झालेली मदत लाखमोलाचीच. मुले जिथे राहतात तिथून या कामाला सुरुवात झाली आणि आजही त्या त्या ठिकाणी राहून निर्धाराने ही मुले रासेयोचे ‘माझ्यासाठी नव्हे तर समाजासाठी’ हे व्रत अंगीकारून प्रत्यक्ष व समाज माध्यामांच्या साहाय्याने कोरोनामुक्तीसाठी धडपडत आहेत. आपल्या स्थानिक पातळीवर योजना बनवत आहेत. गावकऱ्यांना सोबत घेऊन गाव कोरोनामुक्त होईल, असे वैज्ञानिक उपाय शोधात आहेत. स्वत: कोरोनाने ग्रासलो म्हणून हतबल न होता कोरोनातून बरे झाल्यावर कोरोनाग्रस्त झालेल्यांची प्रत्यक्ष विलगीकरण कक्षात जाऊन शुश्रूषा करणारी आणि धडपडणारी मुले पाहिली की रासेयो अधिकारी म्हणून जीव डोंगराएवढा मोठा होतो. ही मुले रक्तदान करत आहेत. दवाखान्यात जाऊन आरोग्य तपासणीसाठी मदत करत आहेत. औषधालयात जाऊन औषधे आणून देत आहेत. वरिष्ठ-वयोवृद्ध व निराधार व्यक्तींना बँकांचे व्यवहार करण्यासाठी मदत करताहेत. रस्त्यांवर रात्री काढणाऱ्या बेवारसांना कपडे पुरवत आहेत. रासेयो योजनेचे विद्यार्थी निर्विकार राहून अराजकीय हेतूने काम करत आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी गाव कोरोनामुक्त करण्याची जबाबदारी सोपवली आहे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ याही उपक्रमात साजेशी कामगिरी करणार यात कुठलीही शंका वाटत नाही. त्यासाठी सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थी शिक्षक व प्राचार्यांचे आणि शैक्षणिक संस्थांच्या प्रमुखांचे सहकार्य लाभेल, याचीही खात्री वाटते.
- डॉ. प्रभाकर देसाई, कार्यक्रम समन्वयक व संचालक,
राष्ट्रीय सेवा योजना, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ