‘फोन टॅपिंग’ प्रकरणी रश्मी शुक्लांवर गुन्हा; राजकीय व्यक्तींचेही फोन बेकायदा टॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 05:31 AM2022-02-27T05:31:11+5:302022-02-27T05:31:48+5:30
रश्मी शुक्ला आणि इतर संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे पोलीस आयुक्त असताना बेकायदा फोन टॅप केल्याप्रकरणी तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
महाराष्ट्र विधिमंडळाच्या २०२१ च्या पावसाळी अधिवेशनामध्ये उपस्थित झालेल्या प्रश्नांनुसार शासनाने २०१५ ते २०१९ या पाच वर्षांच्या कालावधीतील संपूर्ण फोन टॅपिंग प्रकरणी पडताळणी करण्याकरिता राज्य सरकारने तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीचा अहवाल शासनाने स्वीकृत केला. या उच्चस्तरीय समितीने तत्कालीन पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी त्यांच्या कार्यकाळात बेकायदेशीर अभिवेक्षण (फोन टॅपिंग) केले, असे नमूद केल्याने रश्मी शुक्ला आणि इतर संबंधितांवर भारतीय तार अधिनियम कलम २६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
त्यांचे फोनही टॅप
रश्मी शुक्ला या १९८८ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. मार्च २०१६ मध्ये त्यांची पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली होती. या काळात त्यांनी गुन्हेगारांच्या फोन टॅपिंगसाठी परवानगी घेतली. त्याच वेळी त्यांनी काही राजकीय व्यक्तींचेही फोन बेकायदा टॅप केले.