पुण्याच्या वाहतूक समस्येवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शोधणार उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 02:29 PM2019-08-12T14:29:47+5:302019-08-12T14:32:14+5:30
पुण्यातील विविध भागातील वाहतूक समस्यांचा सविस्तर अहवाल स्थानिक पातळीवरील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते करणार आहेत.
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने पुण्याच्या वाहतूक कोंडीवर उपाय शोधण्याचा प्रयत्न करण्यात येणार असून संघाच्या पुणे महानगराच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक रक्षाबंधन उपक्रमांतर्गत यंदा रस्ते वाहतूक सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ ते २५ ऑगस्ट २०१९ दरम्यान राबविण्यात येणाऱ्या या अभियानात संघ परिवारातील संस्था-संघटना, शैक्षणिक संस्था, विविध बँका आणि सामाजिक संघटना सहभागी होणार असून दररोज दहा हजार स्वयंसेवक रस्त्यावर वाहतूकीच्या नियमनासोबतच जनजागृतीचेही काम करणार असल्याची माहिती महानगर संघचालक रविंद्र वंजारवाडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी महानगर कार्यवाह महेश करपे, जनकल्याण समितीचे शैलेंद्र बोरकर आणि तुकाराम नाईक उपस्थित होते. संघाचे स्वयंसेवक २ लाखांहून अधिक घरांपर्यंत व १० लाखांहून अधिक नागरिकांपर्यंत पोहचून रस्ते वाहतुक सुरक्षेसंबंधातील जनजागृती करणार आहेत. या उपक्रमामध्ये महापालिका, वाहतूक पोलिसांचीही आवश्यक मदत घेतली जाणार आहे. तसेच विविध तज्ञ व्यक्तींसह संस्थांचे मार्गदर्शन लाभणार आहे. वंजारवाडकर म्हणाले, वाहतूक कोंडीची ठिकाणे, कोंडीची कारणे याचा अभ्यास करुन अभ्यासपूर्ण अहवाल महापालिका व वाहतूक पोलिसांना सादर केला जाणार आहे.
करपे म्हणाले, समाजामध्ये असलेली प्रचंड शक्ती समाजासाठी उपयोगात यावी यासाठी संघ अविरत प्रयत्न करतो. हे अभियान म्हणजे त्या प्रयत्नांचा मोठा भाग आहे. संघाच्या पुणे महानगरातील आठ भाग, ४७ नगर, ४२३ वस्त्यांमधील शाखा, साप्ताहिक मिलनमधील जवळपास आठ ते दहा हजार स्वयंसेवक या अभियानात सहभागी होणार आहेत.
====
या संस्था होणार अभियानात सहभागी
रिझन टाफिक फाऊंडेशन, सेव्ह पुणे या वाहतूक क्षेत्रात काम करणाºया तज्ञ संस्था, फर्ग्युसन महाविद्यालयासह डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालये, गरवारे महाविद्यालय, महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा व महाविद्यालये, स. प. महाविद्यालयासह शिक्षण प्रसारक मंडळीच्या सर्व शाळा व महाविद्यालये, कमिन्स अभियांत्रिकी महाविद्यालयांसह महर्षी कर्व स्त्री शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालये, ज्ञानदा प्रशाला, सरस्वती मंदिर, इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा, पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, संघटना आर्थिक क्षेत्रातील जनता सहकारी बँक पुणे, जनसेवा बँक, उद्यम बँक, संपदा सहकारी बँक तसेच विश्व हिंदू परिषद, स्व-रूपवर्धिनी, भारतीय मजदूर संघ, स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान, सक्षम, सुराज्य सर्वांगिण विकास प्रकल्प यांसह इतर अनेक संघटना सक्रिय सहभाग नोंदविणार आहेत.
=====
या अभियानाच्या निमित्ताने विविध शैक्षणिक संस्थांतर्फे चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्र प्रदर्शनी पथनाट्ये सादर करण्यात येणार आहेत. सक्षम संस्थेशी जोडले गेलेले दोनशेहून अधिक दिव्यांगजन आपल्या परिसरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अभियानात सहभागी होणार आहेत. तर विविध शैक्षणिक संस्थांमधील शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी रस्ते वाहतुक सुरक्षेसंबंधी शपथ घेणार आहेत.
====
संघाच्या स्वयंसेवकांनी नगर रस्त्यावर प्रायोगिक तत्वावर अभ्यास करुन तेथील वाहतूक समस्येमागील कारणे शोधली असून त्याचा अहवाल तयार केला आहे. त्यासाठी पोलीस, जिल्हा प्रशासनाची आणि तज्ञांची मदत घेतली आहे. अशाच प्रकारे पुण्यातील विविध भागातील वाहतूक समस्यांचा सविस्तर अहवाल स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते करणार आहेत.