‘नृत्यसंगिनी’ने भारावले रसिक
By admin | Published: November 17, 2016 04:08 AM2016-11-17T04:08:52+5:302016-11-17T04:08:52+5:30
गुरू अनुराधा जोग यांच्या अंतरा नृत्य निकेतनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त गौरी चिटणीस हिने ‘नृत्यसंगिनी’ नावाने अरंगेत्रम नृत्य सादर केले.
पुणे : गुरू अनुराधा जोग यांच्या अंतरा नृत्य निकेतनच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त गौरी चिटणीस हिने ‘नृत्यसंगिनी’ नावाने अरंगेत्रम नृत्य सादर केले. कार्यक्रमाची सुरुवात गीतविधी म्हणजे गणेशवंदनेने, तर गौरीच्या मार्गमची सुरुवात मुखचालीने झाली. त्यानंतर जतिस्वरम, वर्णम, पद्म, अष्टलक्ष्मी, तिल्लाना, मंगलम अशा वैविध्यपूर्ण रचनांमधून भरतनाट्यम सादर केले. ताल, ठेक्यावरील आपले प्रभुत्व सादर करीत गौरीने रसिकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले.
‘नृत्यसंगिनी’मधील सर्व नृत्य रचना गुरू अनुराधा जोग यांच्या होत्या. गौरीला गायन साथ नंदिनी राव गुजर, मृदंग साथ तालरत्न पं. एस. शंकरनारायणन, वीणेची साथ गुरू जी. आर. एस. मूर्ती, बासरी साथ सुनील अवचट व सुकन्या गुरव हिने नटुवांगम केले.
गुरू एस. शंकरनारायणन यांना ‘नाद कौस्तुभ’ पदवी बहाल करून अंतरा नृत्य निकेतनने एका नवीन प्रथेचा आरंभ या कार्यक्रमात केला. गायत्री दंडवते व अपूर्वा यज्ञोपवित यांनी कार्यक्रमचे निवेदन केले. कार्यक्रमाच्या शेवटी मंगलमला आणि गौरीच्या नृत्यास प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात उत्स्फूर्त दाद दिली.