Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 01:13 PM2024-10-10T13:13:25+5:302024-10-10T13:15:34+5:30

Ratan Tata Death News : टाटा समुहाच्या पुण्यातील कंपनीमध्ये आजही काम सुरू आहे.

Ratan Tata Death News Keep the company going even after I'm gone Ratan Tata had given instructions | Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच

Ratan Tata Death News : "मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा"; रतन टाटांनी केली होती सूचना, पुण्यातील 'त्या' प्लांटमध्ये आजही काम सुरूच

Ratan Tata Death News : ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने जगभरात दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालायात त्यांच्यावर उपचार सुरु होते. रतन टाटा यांच्या निधनानंतर पंतप्रधान मोदी यांच्यासहित उद्योग क्षेत्रातील दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. उद्योगविश्वात शोककळा पसरली आहे. पण, पुण्यातील टाटा मोटर्स कंपनीमध्ये आजही काम सुरु ठेवण्यात आले आहे. दरम्यान, आज पुण्यातील कंपनीतील कर्मचाऱ्यांनी रतन टाटा यांच्या आठवणी सांगितल्या, यावेळी कर्मचारी भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. 

Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...

आज माध्यमांसोबत बोलताना टाटा उद्योग समुहातील कंपन्यांतील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत काम आजही चालू ठेवण्या मागचे कारण सांगितले. हजारो कर्मचारी काम करत असलेल्या या टाटा मोटर्सच्या प्लांटमध्ये आजही काम बंद ठेवण्यात आलेलं नाही. कारण, 'मी गेल्यानंतरही कंपनी सुरू ठेवा. देशाचं, कामगारांचं नुकसान व्हायला नको असं स्वतः टाटांनी इथल्या कर्मचाऱ्यांना सांगितलं होतं आणि आम्ही त्यांच्या सूचनेनुसार आजही काम करतोय, अशा भावना कामगारांनी व्यक्त केल्या. यावेळी बोलताना कामगारांना अश्रू अनावर झाले. 

पिंपरी चिंचवड शहरातील टाटा मोटर्स युनिटमधील कामगारांनी उद्योगपती रतन टाटा यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा अशी मागणी केली आहे. रतन टाटा यांनी पिंपरी चिंचवडमधील टाटा मोटर्स प्लांटमध्येच निवृत्ती घोषित केली होती, याची आठवणही कर्मचाऱ्यांनी काढली. टाटा प्लांटमधील कर्मचाऱ्यांनी रतन टाटांसोबतच्या आठवणी जाग्या केल्या. यावेळी बोलताना कर्मचारी म्हमाले,  टाटा मोटर्सच्या पिंपरी चिंचवड येथे रतन टाटा नेहमी यायचे, इथल्या प्रत्येक कामगाराला ते भेटायचे त्यांच्याशी बोलायचे.

माध्यमांसोबत बोलताना कामगार म्हणाले,"आमच्यासाठी हा खूप दु:खद दिवस आहे. या दिवसाचा आम्ही कधी विचारही केला नव्हता. टाटा मोटर्सचे अनेक प्लांट आहेत, मात्र पुण्याच्या ठिकाणाची एक वेगळी ओळख होती. रतन टाटा जेव्हा इथे यायचे, तेव्हा ते पहिल्यांदा आपली इच्छा व्यक्त करायचे. ते कामगार युनियनचा खूप आदर करत होते, त्यांनी त्यांच्या निवृत्तीची घोषणा इथेच केली,आम्ही त्यांचा वारसा सुरू ठेवू इच्छितो, त्यांनी कोविडच्या काळात जे केले ते आम्ही कधीही विसरू शकत नाही, असं सांगत कर्मचारी भावूक झाले. 

'टाटा साहेब गेल्यामुळे आम्ही अनाथ झालो'

यावेळी बोलताना दुसरे कर्मचारी म्हणाले, २०१७ साली जेव्हा टाटा मोटर्समध्ये यूनियन आणि मॅनेजमेंटमध्ये संघर्ष सुरू होता तेव्हा आम्ही रतन टाटा यांना भेटलो होतो. आमच्यात अर्धा तास चर्चा झाली. त्यांनी आम्हाला काळजी करु नका तुम्हाला हवे तसे होईल असं सांगितलं होतं. त्यांनी प्रत्येकवेळी दिलेला शब्द पाळलाय. यूनियन टाटा साहेबांच्या शब्दाबाहेर कधीच नव्हती. आज टाटा साहेब गेल्यामुळे आम्ही अनाथ झालोय. प्रत्येक कामगाराची इच्छा अंत्ययात्रेत सहभागी व्हावे अशी आहे. आम्हाला त्यांची आठवण कायम येत राहिलं, असंही ते म्हणाले. 

Web Title: Ratan Tata Death News Keep the company going even after I'm gone Ratan Tata had given instructions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.