मुलांमध्ये वजनवाढीचा वेग १०-१५ टक्क्यांनी वाढला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:10 AM2021-03-25T04:10:46+5:302021-03-25T04:10:46+5:30
वर्षभरापासून मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवल्याने आपण किती खात आहोत, याचे भान मुलांना ...
वर्षभरापासून मुलांचा स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. मोबाईल किंवा टीव्ही पाहत जेवल्याने आपण किती खात आहोत, याचे भान मुलांना राहत नाही. त्यामुळे जास्तीचे अन्न पोटात जाते. टीव्हीवर सातत्याने कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर अशाच जाहिराती दाखवल्या जातात. जाहिरातींकडे मुले आकर्षित होतात. मात्र, जाहिरातींमध्ये कशी अतिशयोक्ती असते हे पालकांनी मुलांना समजावून सांगितले पाहिजे. हिरव्या भाज्या, कडधान्ये, फळे यांच्या जाहिराती कधीही टीव्हीवर दाखवल्या जात नाहीत. मात्र, तेच पौष्टिक अन्न असते, याकडे मुलांचे लक्ष वेधले पाहिजे. पौष्टिक पदार्थ बनवण्यात मुलांना सहभागी करून घेतल्यास त्यांच्यात सकस आहाराविषयी गोडी निर्माण होऊ शकते, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. प्रमोद जोग यांनी सांगितले.
मुलांचे वजन वाढत नाही, अशा अनेक पालकांच्या तक्रारी असायच्या. मुले सतत आजारी पडल्यानेही वजन वाढण्यात अडचणी यायच्या. अशा तक्रारी आता कमी झाले आहेत. दुसरीकडे, अतिवजन असलेली मुले स्थूलतेकडे झुकली आहेत. स्थूलतेमुळे लहान वयातच मुलांमध्ये अतिरिक्त उष्मांक, कोलेस्ट्रेरोल, रक्तदाब अशा समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषतः, ८ ते १५ या वयोगटातील मुलांमध्ये जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते.
-----
''मुलांचे वाढते वजन'' या विषयावर मी सध्या संशोधन करत आहे. प्राथमिक अंदाजानुसार, इतर वेळी ज्या प्रमाणात मुलांचे वजन दर सहा महिन्यांनी किंवा वर्षाने वाढते, त्या प्रमाणात लॉकडाऊन काळात १०-१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मुलाचे जन्माच्या वेळचे वजन पाचव्या महिन्यापर्यंत दुप्पट होते. एक वर्षापर्यंत वजन जन्माच्या वेळच्या वजनाच्या तिप्पट, तर दुसऱ्या वर्षापर्यंत जन्माच्या वेळच्या वजनाच्या चौपट होते. त्यानंतर दर वर्षी एक किलो वजन वाढणे अपेक्षित असते. त्यानुसार पालकांनी आपल्या मुलाच्या वजनाच्या वाढीवर लक्ष ठेवावे. वाढीचे हे प्रमाण वयाच्या दहाव्या वर्षापर्यंत कायम राहते. त्यानंतरची वाढ ही आहार, व्यायाम आणि अनुवंशिकतेवर अवलंबून असते.
- डॉ. प्रमोद जोग, बालरोगतज्ञ
------
स्थूल मुलांमधील आत्मविश्वसही कमी होतो. इतर मुलांच्या तुलनेत चपळता कमी होते.शाळा, मैदानी खेळ बंद असले तरी पालकांनी मुलांना घरच्या घरी शारीरिक हालचालींमध्ये गुंतवून ठेवावे. पालकांनी स्वतःच्या आहारातून मुलांसमोर आदर्श घालून द्यावा.
- डॉ. शमा खरे, बालरोगतज्ज्ञ
-----
हे करावे !
* निरोगी जीवनशैलीचे महत्व लहानपणापासून मुलांच्या मनावर बिंबवावे.
* पौष्टीक खाद्यपदार्थ बनवण्याच्या प्रक्रियेत मुलांना सामावून घ्यावे.
* मुलांच्या दररोजच्या आहारात पालेभाज्या, कडधान्ये, फळे अशा पदार्थांचा समावेश असावा.
------
हे टाळावे!
* कोल्ड्रिंक, पिझ्झा, बर्गर अशा जाहिरातींकडे आकर्षित होऊ नये आणि त्याचे तोटे मुलांना समजावून सांगावेत.
* महिन्याच्या वाणसामानात सॉफ्ट ड्रिंक, बिस्कीट, मॅगी, मैद्याचे इतर पदार्थ यांचा समावेश करू नये.
* हॉटेलिंगचे प्रमाण मर्यादित असावे.