रथास साखरे, शिंदेंची बैलजोडी
By admin | Published: June 16, 2015 12:22 AM2015-06-16T00:22:44+5:302015-06-16T00:22:44+5:30
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलैला होणार असून, या पालखी सोहळ्याच्या पालखी रथाला
देहूगाव : जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३०व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलैला होणार असून, या पालखी सोहळ्याच्या पालखी रथाला जुंपल्या जाणाऱ्या बैलजोडीचा मान हिंजवडीच्या गणेश सुरेश साखरे (रा. हिंजवडी, ता. मुळशी) यांच्या हिरा-तुरा व गणेश गोविंद शिंदे (रा. वडगाव शिंदे, ता. हवेली) यांच्या राजा व सुंदर या पांढऱ्या शुभ्र खिलारी जातीच्या बैलजोडीला मिळाला आहे.
सांगुर्डी (ता. खेड) येथील प्रगतिशील शेतकरी अर्जुन तुकाराम भसे यांच्या बैलजोडीला चौघड्याच्या गाडीला जुंपण्याचा मान मिळाला आहे. या बैलजोडीची निवड पालखी सोहळ्याचे प्रमुख सुनीलमहाराज दिगंबर मोरे, अभिजितमहाराज बाळासाहेब मोरे व जालिंदरमहाराज मोरे यांच्या निवड समितीने केली आहे. या वेळी संस्थानचे अध्यक्ष शांताराममहाराज मोरे, विश्वस्त अशोक निवृत्ती मोरे, सुनीलमहाराज दामोदर मोरे आदी उपस्थित होते.
पालखी रथाला जुंपण्यात येणाऱ्या बैलजोडीची या निवड समितीने जिल्ह्यातील १० बैलजोडींतून या बैलांची चाल, वशिंड, खूर, शेपटी, शिंगे, बैलांची क्षमता व ताकद, उंची पाहून व वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने तपासणी अहवालानुसार व बैलांच्याबद्दल जाण असणाऱ्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने या बैलजोडींची निवड करण्यात आल्याची माहिती पालखी सोहळाप्रमुख अभिजितमहाराज मोरे यांनी दिली. चौघड्याच्या गाडीसाठी मात्र अर्जुन भसे यांचा एकमेव अर्ज आलेला होता. त्यामुळे तो मान त्यांना देण्यात आला.
सध्या या बैलांना चालण्याचा सराव, शेंगदाणा पैंड, विलायती घास गवत यांसारखा खुराक देण्यात येत असून, त्यांना चालण्याचा सराव देण्यात येत आहे. पालखी सोहळा काळात एखादा बैल आजारी झाल्यास अथवा अनुचित प्रकार घडल्यास त्याच्या ऐवजी सक्षम बैलाची व्यवस्था संबंधित मानकरी बैलजोडीमालक करू शकतात.
पोलिसांना पालखी मार्गावर नेमका कधी व कोठे बंदोबस्त लावला पाहिजे, त्याचा अंदाज येणार असून, वाहतुकीची कोंडी टाळता येणार आहेत. प्रशासनाला योग्य वेळेत योग्य ठिकाणी सोयी-सुविधा पुरविण्यास वेळेचा अंदाज बांधता येणार आहे. यासाठी हे अॅप विकसित करण्यात येत असल्याची माहिती अभिजित मोरे यांनी दिली. (वार्ताहर)
एका व्यक्तीने एक झाड बांधावर लावावे
पालखी वर्षी ग्लोबल वॉर्मिंगमुळे सततच्या हवामानातील बदलामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना भविष्यात अधिक संकटाला सामोरे जावू लागू नये म्हणून श्री संत तुकाराम महाराजांची अभंगवाणी सत्यात अवतरण्यासाठी आणि शासनाच्या वृक्षसंवर्धन योजनेला सहकार्य करण्यासाठी वारीत सहभागी होणाऱ्या सर्व भाविकांना, वारकऱ्यांना व पालखी मार्गावरील शेतकऱ्यांना एक व्यक्ती एक झाड आपल्या बांधावर लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यासाठी संस्थानला पिंपरी-चिंचवड महापालिका व आणखी काही सेवाभावी संस्थांच्या वतीने चिंच, आंबा, वड, लिंब यांसारख्या सावली देणाऱ्या या झाडांची रोपे देण्यात येणार आहेत. ती रोपे शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर लावावीत व ती वाढवावीत. पुढील वर्षी यापैकी किमान निम्मी झाडे तरी जगली पाहिजेत. ज्यांना रोपे लगेच लावणे शक्य नाही, त्यांना विविध वृक्षांच्या बियांचे वाटप करण्यात येणार आहे.
पालखी सोहळ्यासाठी स्वतंत्र अॅप
श्री संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करण्यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विविध योजना आखल्या जात असून, त्यांचे साहित्य व त्यांचे विचार प्रत्येक व्यक्तीच्या हातात पडावे यासाठी गतवर्षी व्हर्चुअल दिंडी इंटरनेटद्वारा सर्वांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले आहे. या वर्षी वारीमध्ये पालखीचा रथ नेमका कोठे आहे, कोणत्या रस्त्याने जात आहे, हे भाविकांना नेमकेपणाने कळावे यासाठी श्री संत तुकाराम महाराजांच्या वंशातील स्वप्निल मोरे हे एक अॅप विकसित करीत असून, पालखी सोहळ्यापूर्वी ते सर्वांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी पालखीच्या रथाला जीपीएस यंत्रणा बसविण्यात येणार आहे. याद्वारे भाविकांना पालखी रथ कोणत्या रस्त्यावर, काणत्या मार्गाने जात आहे, याची नेमकी माहिती दाखविणारे चिन्ह मोबाईलवर दिसणार आहे. याचा फायदा पोलीस यंत्रणेला, प्रशासकीय यंत्रणेला होणार आहे.