नदीकाठ सुधारावर कोटी खर्च करण्यापेक्षा शहरातील मुलभूत समस्या सोडवा; नदीप्रेमींचा महापालिकेवर मोर्चा
By श्रीकिशन काळे | Published: August 6, 2023 04:05 PM2023-08-06T16:05:31+5:302023-08-06T16:06:02+5:30
पर्यावरण बदलामुळे शहरातील हवामान बदलाचे बळी आणि वाहतूक कोंडीत सापडलेले पुणेकर वैतागले
पुणे : पुणेकरांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यावर उपाययोजना न करता महापालिका मात्र नदीकाठ सुधार करण्यावर कोट्यवधींचा खर्च करत आहे. ज्याने नदी स्वच्छ होणार नाही. त्याचा विरोध करण्यासाठी पुणेकरांनी ९ ऑगस्ट रोजी पालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. क्रांती दिनी नदीप्रेमी पालिकेच्या समोर जाऊन निषेध करणार आहेत, त्यासाठी नागरिकांसाठी स्वाक्षरी मोहिम सुरू केलेली आहे.
गेल्या काही महिन्यांपासून पुणे महापालिका मुठा नदीकाठ सुधार करण्यासाठी बंडगार्डन येथे काम करत आहे. नदीकाठ सौंदर्यीकरणावर तब्बल ४५७५ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. खरंतर त्यापेक्षा शहरातील रस्त्यांमधील खड्डे दुरूस्त करावेत, नागरिकांना पाण्याचा योग्य पुरवठा करावा, वाहतूक कोंडीपासून सुटका करावी यावर काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे एकूणच महापालिकेच्या कारभाराचा निषेध करण्यासाठी आणि त्यांना जाब विचारण्यासाठी क्रांती दिनी पालिकेच्या समोर मोर्चा काढण्यात येणार आहे.
शहरात अनेक ठिकाणी वृक्ष तोड होते. त्याकडेही दुर्लक्ष केले जाते. पर्यावरण बदलामुळे शहरातील हवामान बदलाचे बळी आणि वाहतूक कोंडीत सापडलेले पुणेकर वैतागले आहेत. आता तर नवीन सादर केलेल्या बिलाद्वारे २०० पेक्षा जास्त वृक्षांची तोड करण्यास स्थानिक संस्थांना अधिकार देण्यात येणार आहेत. त्यामुळे शहरातील आणखी वृक्षांवर संक्रांत येणार आहे. या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी पर्यावरणप्रेमी, नदीप्रेमी एकत्र येत आहेत. निषेधाचे पत्र व स्वाक्षरी जमा करून ते महापालिका आयुक्तांना देण्यात येणार आहे, अशी माहिती संयोजक रेखा जोशी यांनी दिली.