शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची सक्ती शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:25 AM2017-10-03T05:25:53+5:302017-10-03T05:26:05+5:30
केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंचे नुकसान होऊ नये..
पुणे : केंद्र शासनाच्या आदेशानुसार शिधापत्रिकाधारकांना आधारकार्डची करण्यात आलेली सक्ती शिथिल करण्यात आली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गरजूंचे नुकसान होऊ नये, याकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, ग्राहकांना आधार का काढलेले नाही, हे लेखी द्यावे लागणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाही, अशा ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानांमधून येत्या १ आॅक्टोबरपासून स्वस्त धान्य वितरित करण्यात येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गरजूंनाच स्वस्त धान्याचा लाभ मिळावा, म्हणून आधारकार्ड लिंक करण्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र सद्य:स्थितीमध्ये आधारकार्ड काढण्यात येत असलेल्या अडचणी, अपुरी केंद्रे यामुळे आधारकार्ड नसलेले गरीब लाभार्थी वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती. स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य घेणाºया शिधापत्रिकाधारकांना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आला आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाहीत, त्यांना स्वस्त धान्य देण्यात येणार नाही. मात्र, शिल्लक राहिलेले हे धान्य गरजूंना विकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आधारशिवाय शिधापत्रिकाधारकांना धान्य देण्यास मनाई करण्यात आल्याने गोरगरिबांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली होती. ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर धान्य मिळाले नसते तर अडचण निर्माण झाली असती. गरजूंच्या नावाखाली हे धान्य काळ्याबाजारात जाण्याची भीती निर्माण झाली होती. पुरवठा विभागाकडून शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन केले होते.
तूर्तास ही सक्ती मागे घेण्यात आली असून दिवाळीनंतर या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. या काळात आधार क्रमांकाशिवाय धान्य घेणाºया ग्राहकांना आधार नसल्याची लेखी कारणे द्यावी लागणार आहेत. तशा सूचना स्वस्त धान्य दुकानदारांना देण्यात आल्याचे पुरवठा विभागाच्या उपायुक्त नीलिमा धायगुडे यांनी सांगितले.