रेशनकार्डधारकांना मिळणार मोफत धान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:54+5:302021-07-05T04:08:54+5:30
कोरोनाकाळात राज्य शासनाने मे महिन्यात मोफत धान्यवाटप केले होते. तर केंद्र शासनाने मे आणि जून असे दोन महिने ...
कोरोनाकाळात राज्य शासनाने मे महिन्यात मोफत धान्यवाटप केले होते. तर केंद्र शासनाने मे आणि जून असे दोन महिने मोफत धान्य देण्याचे जाहीर केले होते. पुन्हा केंद्र सरकारने जुलै ते नोव्हेंबरपर्यंत मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मे महिन्यात व्यक्तीप्रमाणे ५ किलो मोफत धान्याचे खेड तालुक्यात केंद्र सरकारचे ८९८ टन गव्हाचे तर ५९८ टन तांदळाचे वाटप करण्यात आले. तर राज्य शासनाच्या वतीने ९२३ टन गव्हाचे आणि ५९७ टन तांदळाचे मोफत धान्य वाटप करण्यात आले होते.
खेड तालुक्यात प्राधान्य गटातील ५७ हजार ७६० रेशनकार्ड कुंटुबात २ लाख ९१ हजार व्यक्ती आहेत. तर अंत्योदय योजनेखाली २९६७ रेशनकार्डधारक कुटुंबांत १५ हजार ७२३ माणसे लाभार्थी आहेत. राज्य शासनाच्या वतीने दरमहा वितरीत होणारे गहू आणि तांदूळ मात्र नेहमीच्या दोन आणि तीन रुपये किलोप्रमाणे कार्डधारक खरेदी करण्यासाठी संबंधित दुकानदारांना धान्य कोटा उपलब्ध करुन देण्यात आला आहे. हे धान्य पाँझ मशीनच्या साहाय्याने दिले जाणार आहे. तसेच केंद्र शासनाने व्यक्तीमागे ५ किलो याप्रमाणे मोफत धान्य पुरवठा संबंधित स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तरी याबाबत केंद्राकडून मोफत मिळालेले धान्य देण्यास टाळाटाळ केल्यास यांची तालुका पातळीवर तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा शाखेत तक्रार करण्याचे आवाहन तहसीलदार वाघमारे यांनी केले आहे.