‘रेशन’ धान्य काळ्या बाजाराने

By admin | Published: September 12, 2016 02:10 AM2016-09-12T02:10:09+5:302016-09-12T02:10:09+5:30

स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजाराने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे उघडकीस आला आहे़

'Ration' grain black market | ‘रेशन’ धान्य काळ्या बाजाराने

‘रेशन’ धान्य काळ्या बाजाराने

Next

पिंपरी : स्वस्त धान्य दुकानातील माल काळ्या बाजाराने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमुळे उघडकीस आला आहे़ नेहरुनगर, लालटोपीनगर, आनंदनगर, चिंचवड येथील रेशन दुकानातील माल शिधापत्रिकाधारकांना मिळण्याऐवजी इतर ग्राहकांना काळ्या बाजाराने विकला जात आहे़ दुकानदारांनी कार्डधारक कुटुंबातील प्रत्येक
व्यक्तीचे आधारकार्ड सक्तीचे केले असून, कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आधार कार्ड नसले, तरी त्या व्यक्तीला रेशनिंगवरील माल देण्यास नकार दिला जातो. आधारकार्ड नसल्याने
वाटप न केलेला माल काळ्या बाजाराने विकला जात असल्याची बाब निदर्शनास आली. ऐन सणासुदीच्या काळात गरिबांच्या तोंडचा घास काढण्याचे काम दुकानदार करीत आहेत.


१अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत ज्या
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ५९
हजारांच्या खाली आहे़ त्यांना शासनाकडून पिवळे रेशनकार्ड दिले जाते
आणि त्याद्वारे गहू २ रुपये प्रतिकिलो,
तांदूळ ३ रुपये प्रतिकिलो, साखर १३ रुपये ५० पैसे प्रतिकिलो आणि एका रेशनकार्डधारकाला महिन्यातून एक किलो तूरडाळीचा दर १०३ रुपये आहे़
२शहरातील अनेक कुटुंबांतील काही व्यक्तींची नावे रेशनकार्डमध्ये आहेत; परंतु आधारकार्ड नसल्यामुळे त्यांना रेशनधान्य दुकानात धान्य देण्यास नाकारले जात आहे़ गरिबांचा आधारकार्ड नाही म्हणून जो माल दिला जात नाही, तोच शिल्लक माल चौपट किमतीने इतर ग्राहकांना विकला जात असल्याचा धक्कादायक प्रकार लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनद्वारे उघडकीस आला आहे़
३जानेवारी महिन्यापासून आधारकार्ड नसलेल्या ग्राहकांचा धान्यांचा फ क्त २० टक्के कोटा पुरवठा विभागाकडून
कमी केला आहे़ मात्र, दुकानदारांकडून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे आधारकार्ड सक्तीचे केले आहे़ रेशनधान्य कमी देण्याच्या प्रकारामुळे ऐन सणासुदीच्या काळात गरिबांना अर्धपोटी राहावे लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे़
४शासनाच्या नियमांप्रमाणे गरीब जनतेला आधारकार्ड नसल्यामुळे
धान्य दिले जात नाही़ मात्र
दुकानाचा बोर्ड दर्शनी भागात लावणे, दुकानाची वेळ, वजनकाट्याचे
प्रमाणपत्र जवळ ठेवणे, स्टॉक पुस्तक , रेशनधान्य मालाचा भावफ लक दर्शनी जागेत लावणे अशा नियमांची पायमल्ली दुकानदारांकडून होत आहे़
५सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार स्वस्त धान्य दुकानदारांना हे नियम पाळणे बंधनकारक आहेत़ प्रशासनातील अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी बघ्याची भूमिका घेतली आहे काय असा प्रश्न नागरिक विचारत आहेत़ नियमांचे उल्लंघन करणारे व आधारकार्ड नाही म्हणून गरिबांचे धान्य लाटणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़


आनंदनगर, चिंचवड
वेळ : स. ११.२० मिनिटे
शहरातील दुसऱ्या दुकानात लोकमत प्रतिनिधींनी धान्याची मागणी केली. त्यांच्यात झालेला हा संवाद.
प्रतिनिधी : शेठ ५० किलो गहू आणि साखर मिळेल का?
दुकानदार : कधी पाहिजेत?
प्रतिनिधी : परवा कार्यक्रम आहे़ आज मिळाले तर चांगलेच आहे़
दुकानदार : ठीक आहे. गहू संध्याकाळी देतो; पण ६०० रुपये लागतील़
प्रतिनिधी : ठीक आहे, आणि साखरेच पण बघा.
दुकानदार : संध्याकाळी ठरवू; फ क्त फ ोन करा.
प्रतिनिधी : बरं येतो.


नेहरूनगर : वेळ : स. १0.४५ मिनिटे
लोकमतचे प्रतिनिधी नेहरुनगर येथील स्वस्त धान्य दुकानाच्या समोर रेशन कार्ड नसताना धान्य घेण्यासाठी रांगेत उभे राहिले़ धान्य घेण्यासाठी नंबर आल्यानंतर दुकानदार आणि प्रतिनिधी यांच्यात झालेला संवाद.
प्रतिनिधी : मला तूरडाळ, गहू आणि साखर पाहिजे; मिळेल का? माझ्याकडे रेशनकार्ड नाही.
दुकानदार :(हळू आवाजात) डाळ संपली आहे़ गहू पाहिजेल तेवढा मिळेल.
प्रतिनिधी : बरं ठीक आहे. गव्हाचा एक कट्टा (५० किलो) द्या.
दुकानदार : ६०० रुपयाला मिळेल पिशवी घेऊन या़हा रेशनमाल सरकारी पिशवीत असा देता येत नाही.
प्रतिनिधी : बरं आलो.
(काही वेळानंतर लोकमतचे प्रतिनिधी विनारेशनकार्ड धान्य खरेदी करण्यासाठी पिशवी घेऊन गेले़ गर्दी वाढली होती़ रांगेत न थांबता ते थेट दुकानात गेले. )
प्रतिनिधी : मालक माझ्या भावाने दुसऱ्या दुकानातून काही माल विकत घेतला आहे़ मला फ क्त १० किलो गहू आणि साखर द्या़
दुकानदार : (गड्याला उद्देशून) ये १० किलो गहू मोजून दे. १३० रुपये द्या. प्रतिनिधीने १० किलो गव्हाचे १३० रुपये दुकानदाराला दिले़ साखर मिळेल ना?
दुकानदार : आता नाही. दुकानात गर्दी वाढली आहे़ संध्याकाळी बघू.
दुकानदाराने समोरील गर्दीला उद्देशून ज्यांच्याकडे रेशनकार्ड आहेत त्यांनाच तांदूळ मिळेल़ ब्लॅकने घेण्यासाठी आलेल्यांना आज तांदूळ मिळणार नाही़ हे ऐकून विनारेशनकार्ड माल खरेदी करायला आलेले ग्राहक माघारी निघून गेले.

Web Title: 'Ration' grain black market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.