रेशन दुकानदारांच्या संपामुळे धान्य वितरण रखडले; पुणे शहर जिल्ह्यातील स्थिती
By नितीन चौधरी | Published: January 8, 2024 05:17 PM2024-01-08T17:17:27+5:302024-01-08T17:18:02+5:30
शहरातील ६७३ दुकानांपैकी सुमारे पाचशे दुकाने बंद असल्याचा रेशन दुकानदार संघटनेचा दावा
पुणे : विविध मागण्यांसाठी देशभरातील रेशन दुकानदार संपावर गेले आहेत. त्याचा परिणाम पुणे शहर व जिल्ह्यातही दिसू लागला आहे. जिल्ह्यातील सर्व १ हजार ८२६ दुकानांपैकी एकही दुकान सध्या धान्य वितरण करत नसून शहरातील ६७३ दुकानांपैकी सुमारे पाचशे दुकाने बंद असल्याचा दावा रेशन दुकानदार संघटनेने केला आहे. तर अन्नधान्य वितरण कार्यालयाने ही संख्या केवळ १२८ असल्याचा दावा केला आहे. मात्र, शहर व जिल्ह्यात अद्यापही धान्य वितरणाला सुरुवात झाली नसल्याचे चित्र आहे.
धान्य वितरण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनची तांत्रिक जोडणी टु जी प्रकारातील आहे. त्यामुळे धान्य वितरणात अडचणी येत असून इंटरनेट नसल्यामुळे वारंवार मशीन बंद पडते. त्यामुळेच हे मशीन फोर जी जोडणीचे द्यावे, या प्रमुख मागणीसाठी रेशन दुकानदार सध्या संपावर आहेत. धान्य वितरणासाठी देण्यात येणारे कमिशनदेखील वाढवून मिळावे त्याचप्रमाणे धान्य वितरणातील घट एक किलो अशी वाढवून मिळावी या मागणीसाठी देखील रेशन दुकानदार आंदोलनात उतरले आहे. दर महिन्याच्या ७ किंवा ८ तारखेपासून त्या त्या महिन्याचे धान्य वितरण सुरू केले जाते. मात्र, या महिन्यात धान्य दुकानांपर्यंत पोचले असले तरी अद्याप वितरणास सुरुवात झालेली नाही.
अन्नधान्य वितरण कार्यालयाच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार पुणे व पिंपरी परिसरात ६७३ दुकानदार असून त्यापैकी ई विभागात ७४ व एच विभागात ५४ दुकानदार संपावर असल्याचे सांगण्यात आले. अन्नधान्य वितरण कार्यालयाचा हा दावा खोडू काढत रेशन दुकानदार संघटनेचे पुणे शहराचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी हा आकडा पाचशे ते साडेपाचशे असल्याचे सांगितले. त्यामुळे धान्य वितरण शहराच्या बहुतांश भागात सुरू झाले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. संघटना जास्त असल्याने ठराविक दुकानदारांना बोलवून संप मागे घ्यावा, याबाबत अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून दबाव टाकण्यात असल्याचा आरोप डांगी यांनी यावेळी केला. मात्र, समुपदेश करण्यासाठीच दुकानदारांना बोलवण्यात आल्याचे स्पष्टीकरण अन्नधान्य पुरवठा अधिकारी दादा गीते यांनी दिले. ते म्हणाले, “जानेवारीचे धान्य दुकानांपर्यंत पोचले आहे. संप संपल्यानंतर त्याचे वितरण तातडीने सुरू करण्यात येईल. सात, आठ तारखेनंतर महिन्याचे वितरण सुरू होते त्यामुळे अजूनही वितरण उशिरा झाले आहे असे म्हणता येणार नाही.”
दरम्यान, जिल्ह्यामध्ये १ हजार ८२६ रेशन दुकाने असून ही सर्व दुकाने या संपात सहभागी झाली आहेत. येथेही अद्याप वितरण सुरू झालेले नाही. याबाबत जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. सीमा होळकर म्हणाल्या, “या महिन्याचे धान्य ३० डिसेंबर पूर्वीच सर्व दुकानापर्यंत पोच करण्यात आले आहे. साधारण महिन्याच्या चार तारखेपासून वितरण सुरुवात होते. मात्र, सर्वच दुकानदार संपात असल्याने वितरण अद्याप सुरू झालेले नाही. संपल्यानंतर वितरण सुरू करून सुमारे चार दिवसात त्याचे पूर्ण वितरण करण्यात येईल.”
शहरातील धान्य वितरण
अंत्योदय योजना
गहू ७३.६५ टन
तांदूळ १८४ टन
प्राधान्य योजना
गहू २४९८.७ टन
तांदूळ ३७४८ टन