नव्या वर्षात राज्यातील रेशन दुकाने राहणार बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2023 11:40 AM2023-12-31T11:40:09+5:302023-12-31T11:40:24+5:30

आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

Ration shops in the state will remain closed in the new year, agitation for various demands | नव्या वर्षात राज्यातील रेशन दुकाने राहणार बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलन

नव्या वर्षात राज्यातील रेशन दुकाने राहणार बंद, विविध मागण्यांसाठी आंदोलन

पुणे : विविध मागण्यांसाठी अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघाने सोमवारपासून (दि. १) बेमुदत बंद पुकारला आहे. पुण्यासह राज्यातील रेशनदुकानदार त्यात सहभागी होणार आहेत. देशपातळीवरही ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डिलर्स फेडरेशनने अशाच पद्धतीने बेमुदत बंद पुकारला आहे.

५० हजार रुपये मार्जिन इन्कम गॅरंटी, ३०० रुपये मार्जिन मनी, टूजी ऐवजी फोरजी मशीन, कालबाह्य नियम बदलणे, आनंदाचा शिधा कायमस्वरूपी राबविणे तसेच कांदा, चणाडाळ, तूरडाळ, मूगडाळ या वस्तू रेशन दुकानात उपलब्ध करण्याची मागणी रेशन दुकानदारांनी करत हे आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे पुण्यासह राज्यातील रेशन दुकाने बंद राहतील, अशी माहिती पुणे शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष गणेश डांगी यांनी दिली.

राज्यात सुमारे ५३ हजार रेशन दुकानदार आहेत. त्यांच्या प्रलंबित न्याय हक्क मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन आहे. यापूर्वीच्या आंदोलन आणि मोर्चाची सरकारकडून दखल घेतली नाही. त्यानंतर राज्य सरकारने हिवाळी अधिवेशन काळात महासंघाच्या निवेदनाची दखल घेत नागपूरला सचिवांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यात केवळ आश्वासन देण्यात आले. मात्र, निर्णय झाला नाही. त्यामुळे महासंघाच्या वतीने नाईलाजास्तव एक जानेवारीपासून ऑल इंडिया फेअर प्राइस शॉप डीलर्स फेडरेशनने पुकारलेल्या संपात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी सहभागी होण्याचे आवाहन महासंघाकडून करण्यात आले आहे.

बंदच्या काळात दुकानदारांनी आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन कार्यान्वित करू नयेत. तसेच कोणत्याही प्रकारे धान्याची उचल आणि वितरण करू नये. - गणेश डांगी, अध्यक्ष, पुणे शहर रेशन दुकानदार संघटना

Web Title: Ration shops in the state will remain closed in the new year, agitation for various demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.