आता कोणत्याही दुकानातून रेशनिंग !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 12:55 AM2018-03-14T00:55:25+5:302018-03-14T00:55:25+5:30
एखाद्या मोबाईल कंपनीची सेवा आवडली नसल्यास आपण तोच क्रमांक कायम ठेऊन कंपनी बदलू शकतो. त्याच पद्धतीने आता रेशनिंग दुकानदारही बदलता येणार आहे.
विशाल शिर्के
पुणे : एखाद्या मोबाईल कंपनीची सेवा आवडली नसल्यास आपण तोच क्रमांक कायम ठेऊन कंपनी बदलू शकतो. त्याच पद्धतीने आता रेशनिंग दुकानदारही बदलता येणार आहे. शिधापत्रिकाधारकांना पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य घेता येईल.
शहर अन्नधान्य वितरण कार्यालयांतर्गत पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील सर्व रेशनिंग दुकानदार येतात. येथील तब्बल ३ लाख ७९ हजार ८५३ रेशनिंग दुकानदारांना याचा फायदा होणार आहे. प्रत्यक शिधापत्रिकाधारकाला आपला हक्काचे धान्य मिळावे या साठी ही योजना सुरु करण्यात आली होती. या पुर्वी शहरातील ग आणि ई या परिमंडळात प्रायोगिक तत्त्वावर ही योजना सुरु करण्यात आली. या महिन्याच्या १ तारखेपासून संपूर्ण शहरात ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
शहरात अंत्योदयचे ९ हजार ७५२ शिधापत्रिकाधारक असून, त्यावर ४१ हजार १५७ लाभार्थी आहेत. या श्धिापत्रिकाधारकांना प्रतिकार्ड २० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ आणि १ किलो साखर देण्यात येते. अन्नसुरक्षेचा शिक्का असलेली ३ लाख ३८ हजार ६९६ शिधापत्रिका शहरात आहेत. त्यावर १३ लाख ७४ हजार ३५२ लाभार्थ्यांची नोंद आहे. त्यांना प्रति लाभार्थी ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ देण्यात येते.
>अजूनही ३५ टक्के लाभार्थी आधार कक्षे बाहेर
शिधापत्रिकेवरील जवळपास ३५ टक्के लाभार्थ्यांचे आधारकाडू अजूनही पॉस यंत्राला जोडण्यात आलेले नाहीत. अंत्योदयच्या ९ हजार ७५२ शिधापत्रिकाधारकांपैकी एकाने तरी आधारकार्ड जोडल्याची टक्केवारी ८७ टक्के इतकी आहे. तर, ४१ हजार १५७ लाभार्थ्यांपैकी ६५ टक्के लाभार्थ्यांचे आधार जोडण्यात आले आहे. अन्नसुरक्षेच्या ३ लाख ३८ हजार ६९४ शिधापत्रिकाधारकांपैकी ८२ टक्के कार्डधारकांनी किमान एकाचे तरी आधारकार्ड जोडले आहे. तर, १३ लाख ७४ हजार ३५२ लाभार्थ्यांपैकी ६२ टक्के लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक झाले आहे. कोणत्याही रेशानिंग दुकानदारांकडे आधारकार्डची छायाप्रत (झेरॉक्स) दिल्यास पॉस यंत्राद्वारे आाधारकार्ड लिंक करता येईल.
>दुकानदारांकडे पॉस यंत्र : आधार नोंदविता येणार
प्रत्येक रेशनिंग दुकानदारांना पॉस यंत्र (पॉईंट आॅफ सेल) देण्यात आले असून, त्या अंतर्गत शिधापत्रिकेवर नाव असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हाताच्या दहा बोटांचे ठसे घेण्यात येत आहे. तसेच आधार क्रमांक देखील नोंदविण्यात येत आहे.
ठशांची नोंद असणाºया व्यक्तींना शिधापत्रिकेच्या माध्यमातून धान्य वितरीत करण्यात येत आहे. हा सर्व डाटा पॉस यंत्राला जोडलेला असल्याने, शिधापत्रिकाधारकांना कोणत्याही रेशनिंग दुकानातून धान्य घेणे शक्य होत आहे. एखादा दुकानदार सेवा चांगली देत नसल्यास अथवा इतर कोणत्याही कारणास्तव शिधापत्रिकाधारक कोणत्याही दुकानातू धान्य घेऊ शकतात.
>शिधापत्रिकाधारकांचे पॉस यंत्रात नाव नसल्यास, बोटाचे ठसे जुळत नसल्यास अथवा अन्य तांत्रिक कारणामुळे कोणत्याही शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित ठेवणार नाही. मात्र, महिनाभरात ही दोष दुरुस्ती त्यांना करावी लागेल. त्यासाठी रेशनिंग दुकानदार संबंधित शिधापत्रिकाधारकांना दोष असल्याचे पत्र देतील. त्यांना ते पत्र घेऊन परिमंडळ अधिकाºयांकडून दोष दुरुस्ती करुन घ्यावी लागेल. महिनाभरात दोष दुरुस्त न केल्यास संबंधितांना धान्य वितरीत केले जाणार नाही.
- रघुनाथ पोटे,
अन्न-धान्य वितरण अधिकारी