रेशनिंगचा काळाबाजार थांबणार
By admin | Published: June 15, 2017 04:48 AM2017-06-15T04:48:33+5:302017-06-15T04:48:33+5:30
स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी हवेलीतील सुमारे सत्तर रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक प्रणाली मशिन्सचे वाटप करण्यात आले. त्याविषयीचे
लोकमत न्यूज नेटवर्क
लोणी काळभोर : स्वस्त धान्य दुकानातील काळाबाजार रोखण्यासाठी हवेलीतील सुमारे सत्तर रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक प्रणाली मशिन्सचे वाटप करण्यात आले. त्याविषयीचे प्रात्यक्षिक व योग्य प्रशिक्षण तालुक्यातील दुकानदारांना देण्यात आले आहेत. सर्व व्यवहार बायोमेट्रिक प्रणालीद्वारे करण्याच्या सूचना पुरवठा विभागाद्वारे देण्यात आल्या आहेत.
प्रात्यक्षिक व प्रशिक्षण कार्यक्रमास जिल्हा पुरवठा अधिकारी दिनेश भालेदार, सहाय्यक पुरवठा अधिकारी अनिल कांरडे, हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ, नायब तहसीलदार उत्तम बडे, तालुका
पुरवठा निरिक्षक अविनाश डोईफोडे उपस्थित होते.
सर्वसामान्यांना शासकिय कोट्यातील स्वस्त धान्य मिळत नसल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहे. काही रेशनिंग दुकानदार आर्थिक फायद्यासाठी शासकीय कोट्यतून आलेल्या धान्यांची परस्पर विल्हेवाट लावून नागरिकांना धान्याचा साठा या वेळी आला नसल्याची उत्तरे देत असल्याचे बहुतांशी प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले. हा गैरव्यवहार रोखण्यासाठी शासनाने बायोमेट्रिक प्रणाली यंत्राचा अवलंब केला असल्याची माहिती पुरवठा कार्यालयातून देण्यात आली.
हवेली तालुक्यातील सर्व रेशनिंग दुकानदारांना बायोमेट्रिक मशिन्सचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी उपस्थित दुकानदारांच्या सर्व शकांचे निरसन करण्यात आल्याने स्वस्त धान्य दुकानदारांनी समाधान व्यक्त केले.
बायोमेट्रिक प्रणालीचा वापर संपूर्ण पुणे जिल्ह्यात करावयाचा असून, त्याची सुरुवात हवेलीमध्ये केली आहे. या प्रणालीचा वापर
न करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाई केली जाईल.
- दिनेश भालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी