रेशनिंगचा काळाबाजार करणारा स्थानबद्ध
By admin | Published: October 4, 2016 01:46 AM2016-10-04T01:46:13+5:302016-10-04T01:46:13+5:30
रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर अत्यावश्यक वस्तूंचा कायदा १९५५च्या तरतुदींंनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून
पुणे : रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार करणाऱ्यावर अत्यावश्यक वस्तूंचा कायदा १९५५च्या तरतुदींंनुसार स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली असून, गोरगरिबांच्या तोंडचा घास हिसकावणाऱ्या ‘रेशनिंग माफियांना’ यामुळे चाप बसण्यास मदत होईल. कारवाई करण्यात आलेल्या आरोपीची एक वर्षासाठी अमरावती कारागृहामध्ये रवानगी करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. अशा प्रकारे करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे.
गोकुळ साहेबराव साबळे (वय ३३, रा. जुन्या हौदाजवळ, माळवाडी, हडपसर) असे कारवाई करण्यात आलेल्याचे नाव आहे. साबळे याच्याविरुद्ध एकूण चार गुन्हे दाखल असून, अन्नधान्याच्या काळ्याबाजाराचे दोन गुन्हे दाखल आहेत. बेकायदेशीर हत्यार बाळगणे आणि जबर मारहाणीचाही गुन्हा त्याच्याविरुद्ध दाखल आहे. त्याने स्वत:ची संघटित टोळी तयार केली आहे. पुण्यातील रेशनिंग दुकानदारांना धमक्या देऊन तसेच मारहाण करून तो जबरदस्तीने रेशनिंगवरचे धान्य स्वस्त दरात विकत घेत होता.
रेशनिंगचे धान्य खुल्या काळ्याबाजारात अधिक किमतीने विकत होता. मागील तीन ते चार वर्षांपासून तो हे रॅकेट चालवीत होता. निगडी पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध २०१३मध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या वेळी १६,७५० किलो तांदूळ, ९ हजार ८०० किलो गहू आणि एक ट्रक असा १५ लाख ११ हजार ४०० रुपयांचा माल जप्त करण्यात आला होता.
त्यानंतर त्याच्या या गैरकृत्यांची माहिती अन्नधान्य वितरण कार्यालयात देण्याचा प्रयत्न केला असता त्याने गुन्हेगारांच्या मदतीने सामाजिक कार्यकर्त्यावर तलवार व सत्तूरने वार केले होते. या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याच्या कारवायांबाबत खडक पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संजय गायकवाड, अनंत व्यवहारे यांनी गुप्त माहिती काढली होती. १६ जून २०१६ रोजी सकाळी सहाच्या सुमारास मनपा वसाहतीमध्ये गव्हाच्या ५० किलोंच्या २०९ पोत्यांसह ताब्यात घेण्यात आले होते.
रेशनिंगच्या पोत्यांमधून हे धान्य साध्या पोत्यांमध्ये भरण्यात येत असतानाच पोलिसांनी कारवाई केली होती. त्याने आसपासच्या रेशनिंग दुकानदारांवर दहशत निर्माण केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.