रत्नागिरी हापूस काही दिवसांसाठीच
By admin | Published: May 29, 2017 02:46 AM2017-05-29T02:46:29+5:302017-05-29T02:46:29+5:30
खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारा रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी ८ ते १० दिवस हापूसची आवक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरविणारा रत्नागिरी हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. आणखी ८ ते १० दिवस हापूसची आवक बाजारात सुरू राहणार आहे. दरम्यान, रत्नागिरी हापूस गेला तरी पुणेकरांना गावरान हापूसची चव चाखता येणार आहे. गावरान हापूसची आवक वाढली असून भावही आवक्यात आहेत.
रत्नागिरी हापूसचा हंगाम यंदा लवकर सुरू झाला होता. पोषण वातावरणामुळे उत्पादनही चांगले आहे. त्यामुळे या हंगामात रत्नागिरी हापूस लवकरच सर्वसामान्यांच्या आवक्यात आला. आता कोकणामध्ये मॉन्सूनचे वारे वाहू लागल्याने हंगाम जेमतेम ८ ते १० दिवसांचा उरला आहे. या काळात बाजारात आवक होत राहील. मात्र, प्रमाण तुलनेने कमी असणार आहे. कर्नाटक हापूसची आवक तुलनेत दोन आठवड्यापर्यंत होईल.
रविवारी बाजारात रत्नागिरी हापूसची १ ते २ हजार पेटी, तर कर्नाटक हापूसच्या ४ ते ५ हजार पेट्यांची आवक झाली.
बाजारात भोर, वेल्हा, खडकवासला, मावळ व मुळशी भागातून गावरान हापूस, पायरी आणि रायवळची आवक वाढू लागली आहे. रविवारी बाजारात सुमारे १०० डागांची आवक झाली. ही आवक जुलै महिन्यापर्यंत कायम राहील, असे व्यापारी तात्या कोंडे यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील
आंब्याचे भाव
रत्नागिरी हापूस (तयार ) -
४ ते ६ डझन - ८०० ते १२००
८ ते १० डझन - १००० ते १३००
कर्नाटक हापूस (तयार)
३ ते ५ डझन - ६००-१०००
कर्नाटक पायरी (तयार)
३ ते ५ डझन - ५०० ते ७००
"
गावरान आंबा (प्रतिडझन)
गावरान - २०० ते २५०
पायरी - १०० ते १२०
रायवळ - ४०
लालबाग (१ किलो) १५ -२०, तोतापुरी (१ किलो) १५-२०, नाटी (१ किलो) १३-१६, बदाम (१ किलो) २०-२५, गुजरात केशर (१ किलो) ४०-५०, गुजरात हापूस (१ किलो) ५०-६०, राजपुरी (१ किलो) २५-५०.