अक्षयतृतीयाच्या मुहूर्तावर ‘रत्नागिरी’ची चव ‘कर्नाटक’वर भागवणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 12:48 PM2019-05-06T12:48:14+5:302019-05-06T12:52:46+5:30
येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते..
पुणे: अक्षयतृतीच्या मुहूर्तावर रविवारी (दि.५) गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ विभागामध्ये पुणेकरांनी आंबा खरेदीसाठी गर्दी केली. परंतु रत्नागिरी हापूसचे दर अद्यापही सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्याबाहेरच असल्याने पुणेकरांनी ‘रत्नागिरी’ ची चव ‘कर्नाटक’ वर भागवली आहे. कर्नाटक तयार हापूस ३०० ते ५०० रुपये डझनने मिळत असून, रत्नागिरी हापूसचे दर ५०० ते ७०० रुपये डझन असल्याचे रत्नागिरी हापूस आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे यांनी सांगितले.
येत्या मंगळवार (दि.७)रोजी अक्षयतृतीया असून, या मुहूर्तावर नागरिकांकडून आंब्याला मोठ्या प्रमाणात मागणी असते. अक्षयतृतीयाला आंब्याची मागणी वाढत असल्याने आंब्याचे दर देखील वाढतात. परंतु यंदा सुरुवातीपासूनच रत्नागिरी आणि देवगड हापूस आंब्याचे दर अधिकच आहेत. अद्यापही हे दर सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेरच आहेत. गेल्या तीन-चार दिवसांपासून मार्केट यार्डामध्ये आंब्याची आवक चांगलीच वाढली आहे. परंतु यामध्ये रत्नागिरी तयार हापूस मात्र मागणीच्या तुलनेत कमी आहे. यामुळे कच्च्या आंब्याची आवक वाढून देखील हापूसचे दर मात्र कमी झाले नसल्याचे व्यापा-यांनी सांगितले. रविवार (दि.५) रोजी रत्नागिरी हापूस कच्च्या आंब्याची सुमारे १० ते १२ हजार पेट्या आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांपासून ही आवक कायम असली तरी तयार आंबा तुलनेत कमी आहे. यामुळे होलसेल मार्केटमध्ये रत्नागिरी तयार हापूसच्या ४ ते ८ डझनचे दर १५००-३००० रुपये ऐवढे दर मिळत आहे.
दरम्यान अक्षयतृतीयाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक हापूस आंब्याच्या तब्बल १८ हजार ते २० हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या तीन-चार दिवसांत ही आवक २५ ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. आवक मोठ्या प्रमाणात वाढल्याने दरामध्ये देखील २० ते २५ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे किरकोळ बाजारामध्ये प्रतवारीनुसार कर्नाटक हापूस आंबा २५० ते ५०० रुपये डझन पर्यंत मिळत आहे. रविवारी मार्केट यार्डात कर्नाटक हापूस कच्चा ४ ते ५ डझनमागे ५०० ते १००० रुपये दर मिळाला असल्याचे कर्नाटक हापूसचे व्यापारी रोहन उरसळ यांनी सांगितले.
-------------------
आंब्याचे दर
रत्नागिरी हापूस (कच्चा) : ४-८ डझन १२०० ते २८०० रुपये
रत्नागिरी हापूस (तयार) : ४-८ डझन १५०० ते ३००० रुपये
कर्नाटक हापूस (कच्चा) : ४-५ डझन ५०० ते १००० रुपये
कर्नाटक हापूस (तयार) : ४ -५ डझन १२०० ते १५०० रुपये
पायरी : ४ डझन ४०० ते ८०० रुपये
लालबाग : २० ते ३० रुपये किलो
बदाम : ३० ते ४० रुपये किलो
तोतापूरी : २० ते ३५ रुपये किलो
मलिका : ३५ ते ४५ रुपये किलो
---------------------------
रत्नागिरी हापूसच्या नावाखाली कर्नाटक हापूसची विक्री
अक्षयतृतीच्या पार्श्वभूमीवर आंब्याची मागणी वाढल्याने सध्या शहरामध्ये रस्त्या-रस्त्यावर , गल्ली-बोळांमध्ये आंब्याची विक्री सुरु आहे. परंतु या किरकोळ विक्रेत्यांकडून रत्नागिरी हापूस असल्याचे सांगून कर्नाटक हापूसची विक्री केली जात आहे. रत्नागिरी आणि कर्नाटक हापूस दिसायला सारखेच असल्याने व्यापा-यांकडून फायदा घेतला जात आहे. परंतु दोन्ही आंब्याच्या चवीमध्ये खूपच फरक आहे. रत्नागिरी आंबा अधिक मधुर असतो. त्यातुलनेत कर्नाटक हापूसची चव नसते.