'रत्नाकर पारितोषिक'ला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:11 PM2018-01-23T12:11:57+5:302018-01-23T12:15:24+5:30
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१७) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतीप्रित्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' मौज या दिवाळी अंकाला उत्कृष्ट दिवाळीअंकाचा पुरस्कार मिळाला.
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (२०१७) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.
या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतीप्रित्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' मौज या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ललित' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'समदा' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'साहित्य शिवार' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट आॅनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'अक्षरनामा' या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे. 'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक' 'मनशक्ती' या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'अक्षर' या दिवाळी अंकातील विजय खाडिलकर यांच्या 'आवर्त' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दशिवार' या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या 'येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुज्या देहाला' या लेखाला जाहीर करण्यात आले आहे, अशी माहिती या स्पर्धेचे निमंत्रक आणि ग्रंथालय विभागाचे कार्यवाह वि. दा. पिंगळे यांनी दिली. या स्पर्धेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १८८ दिवाळी अंक आले होते. त्यातून वरील दिवाळी अंकाची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर, विनया देसाई, प्रभा सोनवणे यांनी आणि आॅनलाईन दिवाळी अंकासाठी प्रतिक पुरी यांनी काम पाहिले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार १ फेब्रुवारी २०१८ सायंकाळी ६.३० वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात चित्रकार रवी परांजपे आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. दिवाळी अंकाना १०९ वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. दिवाळी अंक आणि मराठी माणूस यांचे अतूट नाते आहे. मराठी भाषेची ही वैभवशाली परंपरा जपण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली ५० वर्ष दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दजेर्दार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या दमाच्या आणि कसदार लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे, या भूमिकेतून ही स्पर्धा आयोजित केली जाते, असे प्रा. जोशी यांनी सांगितले.