कोंढवा फसवणुक प्रकरणात रत्नाकर पवार, अशोक अहिरे यांना चार दिवस पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 19:17 IST2020-06-24T19:11:22+5:302020-06-24T19:17:00+5:30
जादा नफ्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची 1 कोटी 64 लाखांची फसवणूक केली.

कोंढवा फसवणुक प्रकरणात रत्नाकर पवार, अशोक अहिरे यांना चार दिवस पोलीस कोठडी
पुणे : भागीदारीमध्ये बांधकाम व्यवसाय करण्याचे व जादा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची १ कोटी ६४ लाख रुपयांची फसवणुक केल्याप्रकरणी नाशिक येथील भाजपचे नेते आणि बांधकाम व्यावसायिक रत्नाकर ज्ञानदेव पवार यांना न्यायालयाने २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्यासह अशोक अहिरे (रा. नाशिक) यांचाही समावेश आहे.
या प्रकरणात यापूर्वी चार जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मोहद्दीस फारुख बखला (रा. एनआयबीएम रोड, कोंढवा) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणात रत्नाकर पवार व इतरांनी बखला यांना वेगवेगळी आश्वासने देऊन कंपनीत भागीदारी देत असल्याचे सांगून त्यांच्याकडून विविध प्रकल्पात गुंतवणुक करण्यासाठी तसेच कामगारांचे पगार व इतर कामांसाठी वेळोवेळी १ कोटी ६४ हजार ३८७ रुपये घेतले. त्यापैकी बखला यांनी पवार आणि अहिरे यांना ६३ लाख रुपये दिले होते. त्यानंतर पवार व त्यांच्या साथीदारांनी त्या प्रकल्पात पैसे न वापरता त्याचा उपयोग स्वत:साठी केला. कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर रत्नाकर पवार यांनी सत्र न्यायालय, उच्च न्यायालय आणि शेवटी सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली. परंतु, सर्व ठिकाणी त्यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला.
त्यानंतर कोंढवा पोलिस त्याचा शोध घेत होते.परिमंडळात पाचचे पोलिस उपआयुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल कलगुटकर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, महादेव कुंभार, पोलिस कर्मचारी विशाल गवळी, नितीन कांबळे यांच्या पथकाने दोघांना अटक केली.
पवार याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात फसवणूक आणि अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी अशा प्रकारे आणखी कोणाची फसवणूक केली आहे का? व पुढील तपासासाठी त्यांना पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील ज्योती वाघमारे यांनी केली. न्यायालयाने दोघांची २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.