निवडणूक प्रचारासाठी 'रात्रीस खेळ चाले'; मावळात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 01:29 PM2022-12-16T13:29:41+5:302022-12-16T13:30:01+5:30
सध्या रात्रीच्या प्रचारावर जोर दिला जात असल्याचे चित्र....
- ज्ञानेश्वर भंडारे
पिंपरी :मावळ तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी विविध क्लुप्त्या वापरल्या जात असून, उमेदवारांनी मतांच्या गोळा बेरजेवर लक्ष केंद्रीत केले आहे. कुणाचं मत मिळणार वा मिळणार नाही, याकडे लक्ष दिले जात आहे. सध्या रात्रीच्या प्रचारावर जोर दिला जात असल्याचे चित्र आहे.
शिरगावची ग्रामपंचायत बिनविरोध झाली तर इंदोरी, कुणेत, शिरगाव, भोयरे, वर्सोली, गोडुंर्बे, निगडे या गावांमधील ग्रामपंचायत निवडणूक सुरू असल्याने सध्या राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सद्यस्थितीत ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून, मतदारांची मते आपल्या बाजूने खेचण्यासाठी उमेदवार मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीने मोहीत करण्यासाठी विविध आश्वासनांची खैरात करत आहत. तरीही चाणाक्ष मतदारांनी प्रत्येक उमेदवाराला झुलवत ठेवून ‘साहेब, चिंता करू नका, आपलीच हवा आहे,’ असे सांगून दिलासा देण्याचा फंडा अवलंबविल्याचे चित्र निवडणूक असलेल्या सात गावांमध्ये दिसून येत आहे.
रब्बी हंगाम सुरू झाल्याने शेतकरी, मजूर दिवसभर शेतात असल्याने गावात सामसूम असते. यामुळे निवडणुकीत उतरलेल्या पॅनल प्रमुख व उमेदवारांकडून सकाळी आठ वाजण्याच्या अगोदर गावातून प्रचाराची एक फेरी पूर्ण केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. नऊ वाजल्यानंतर प्रचार थांबविला जात आहे. शेतकरी, मजूर मतदार सायंकाळी ६ वाजेपर्यंत गावात येत असल्याने उमेदवारांकडून रात्री ७ ते १० यावेळेत प्रचारावर भर दिला जात आहे. रात्री १० नंतर प्रचारावर बंदी असल्याने उमेदवारांकडून घरोघरी बैठका घेतल्या जात आहेत. समर्थक कार्यकर्ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रचाराची धुरा सांभाळत आहेत.
यंदा मत तुम्हालाच
निवडणूक असलेल्या गावांमध्ये तरुणाईत उत्साह असल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचा प्रचार गावासाठी पिण्याचे पाणी, रस्ते, वीज या विषयांभोवती फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सकाळी व रात्री कार्यकर्ते गावात घरोघरी फिरून निवडणुकीनंतर आम्ही काय करणार आहोत, याचा पाढा वाचत आहेत. मतदारही ‘यंदा मत तुम्हालाच’ असे सांगून उमेदवारांचा उत्साह वाढवत आहेत.
प्रचारासाठी उरले काही तास
ग्रामपंचायत निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात असून, १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यामुळे उमेदवारांना शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्रचार करता येणार असल्याची माहिती तहसील कार्यालयातील निवडणूक विभागाने दिली.