आचारसंहितेत अडकला ‘रावण दहन’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 09:38 PM2019-10-06T21:38:28+5:302019-10-06T21:38:56+5:30

पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाला पाेलिसांनी परवानगी नाकारली आहे.

'Ravan Dahan' stuck in the code of conduct | आचारसंहितेत अडकला ‘रावण दहन’

आचारसंहितेत अडकला ‘रावण दहन’

googlenewsNext

पुणे : गेली २१ वर्षे पुणे शहरातील आकर्षण असलेला रावण दहनाचा कार्यक्रम यंदा आचारसंहितेत अडकला आहे. निवडणुकीनिमित्त आचारसंहिता असल्याचे कारण देत पुणे पोलिसांनी पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने साजरा करण्यात येणाऱ्या रावण दहन कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. पुणे लोकमान्य फेस्टिवलच्या वतीने लोकमान्यनगरमध्ये नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानंतर दसऱ्याला नदीपात्रात रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असे.  त्यानंतर टिळक रोडवरील न्यू इंग्लिश स्कुल, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे मैदान अशा जागी रावण दहनाचे कार्यक्रम झाले आहेत.

याबाबत पुणे लोकमान्य फेस्टिवलचे अ‍ॅड़ गणेश सातपुते यांनी सांगितले की, गेल्या २१ वर्षात अनेकदा निवडणुकांच्या आचारसंहिता लागू होत्या़ परंतु, कधीही रावण दहन या कार्यक्रमास आचारसंहितेचा बडगा दाखवून परवानगी नाकारली नाही़. यंदा आम्हाला सिंहगड रोडवरील फन टाईमच्या मागील शिंदे मैदानात परवानगी मिळाली आहे. जागा मालक, अग्निशमन दल यांनी ना हरकत पत्र मिळाले आहे. तसेच स्पिकर जनरेटर, लाईट व मंडप मालकांच्या पत्रासह आम्ही २८ सप्टेंबर रोजी सिंहगड रोड पोलिसांना परवानगीसाठी अर्ज केला. त्यांनी परिमंडळ ३ च्या पोलीस उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांना भेटण्यास सांगितले़ त्यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांना भेटायला सांगितले़ त्यांनी परवानगी नाकारल्याची नोटीस दिली.

याबाबत उपायुक्त पोर्णिमा गायकवाड यांची भेट घेतली असता त्यांनी आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असल्याने व आचारसंहिता लागू असल्याने आपणास परवानगी देता येणार नसल्याचे सांगितले. यापूर्वी गेली २१ वर्षात कोणत्याही राजकीय पक्षाचा झेंडा, बॅनर न लावता अराजकीय स्वरुपाचे व्यासपीठ तयार केलेले असताना सुद्धा आम्हाला आचारसंहितेचा बडगा दाखविण्यात आला आहे. रावणाच्या प्रतिकृतीची तयारी पूर्ण झाली असून पोलिसांनी परवानगी नाकारल्याने या प्रतिकृतीचे दहन करावे की पुराच्या पाण्यात विसर्जन करावे असा आम्हाला प्रश्न पडला आहे. याविरुद्ध आम्ही सोमवारी न्यायालयात दाद मागणार आहोत.

याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार शेळके यांनी सांगितले की, जे पूर्वीपासून नवरात्र महोत्सव करीत आहेत, त्यांना आम्ही परवानगी दिली आहे़ ते शिंदे मैदानावर प्रथमच हा कार्यक्रम करत आहे. या कार्यक्रमाच्या वेळी राजकीय नेते, कार्यकर्ते येण्याची शक्यता असल्याने आम्ही परवानगी नाकारली आहे. ते पूर्वी जेथे कार्यक्रम करीत होते, त्या ठिकाणी त्यांनी परवानगी घ्यावी.

Web Title: 'Ravan Dahan' stuck in the code of conduct

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.