दशहत माजविणारी रावण साम्राज्य टोळी गजाआड
By admin | Published: April 6, 2017 03:07 PM2017-04-06T15:07:33+5:302017-04-06T15:07:33+5:30
पिंपरी चिंचवड, देहुरोड,खडकी आणि ग्रामीण भागात नंग्या तलवारी, चॉपर, रॉड अशी घातक शस्त्रे घेऊन खुले आम वावरत नागरिकांमध्ये दहशत पसरवायची
ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. 6 : पिंपरी चिंचवड, देहुरोड,खडकी आणि ग्रामीण भागात नंग्या तलवारी, चॉपर, रॉड अशी घातक शस्त्रे घेऊन खुले आम वावरत नागरिकांमध्ये दहशत पसरवायची. हुक्का पार्लर, मटक्याचे अड्डे या ठिकाणाहून रोकड लुटायची. असे कारनामे करणाऱ्या वाल्हेकरवाडी, रावेत परिसरातील रावण साम्राज्य टोळीला गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने गजाआड केले. शस्त्र घेऊन दरोड्याच्या तयारित असताना, त्यांना खडकी रेल्वे स्थानकाजवळ पोलिसांनी ताब्यात घेतले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अनिकेत राजू जाधव (वय २१,जाधववस्ती,रावेत) हा रावण साम्राज्य टोळीचा प्रमुख सूत्रधार आहे. या प्रमुख आरोपीसह विनोद निजाप्पा गायकवाड (वय २२,वाल्हेकरवाडी), रवि काशिनाथ अशिंगळ (वय २०,रा.धर्मराज चौक, रावेत),अविनाश राजेंद्र जाधव ( वय २४,रा. जाधववस्ती रावेत) सागर सिताराम जाधव (वय २६,रावेत),अरिफ शमशुद्दीन शेख (वय २६,वाल्हेकरवाडी) या त्याच्या साथीदारांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने खडकी रेल्वे स्थानकाजवळ अटक केली. दोन गावठी कट्टे,तीन काडतुसे,कोयता,त्तलवार आदी घातक शस्त्र बाळगून दरोड्याच्या तयारीत असलेल्या या टोळीला पोलिसांनी शिताफिने पकडले. त्यांच्याकडून शस्त्र तसेच मोबाईल,मोटार असा एकुण ५ लाख ७९ हजार ९०० रूपयाचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
रावण साम्राज्य टोळीतील हे गुन्हेगार पुर्वी महाकाली टोळीत कार्यरत होते. देहुरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २०११ ला महाकालीचा एन्काऊंटर झाला. त्यानंतर महाकाली टोळीतील सदस्यांनीच रावण साम्राज्य अशी स्वतंत्र टोळी तयार केली आहे.