रावेतचा पूल बनतोय प्रेमी युगुलांचा अड्डा
By admin | Published: April 26, 2017 03:57 AM2017-04-26T03:57:08+5:302017-04-26T03:57:08+5:30
पुनावळे रावेत बंधाऱ्यावरीवल संत तुकाराममहराज हँगिंग पूल गेल्या काही वर्षांपासून प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. तरुण तरुणींचे अश्लील चाळे
वाकड : पुनावळे रावेत बंधाऱ्यावरीवल संत तुकाराममहराज हँगिंग पूल गेल्या काही वर्षांपासून प्रेमी युगुलांचा अड्डा बनला आहे. तरुण तरुणींचे अश्लील चाळे आणि दररोजचा धांगडधिंगा यामुळे स्थानिक रहिवाशांना मान शरमेने खाली घालून ये-जा करण्याची वेळ आली. या प्रेमी युगुलांचा बंदोबस्त केण्याची मागणी नागरिक व सामाजिक संघाटनांकडून होऊ लागली आहे.
दुपारच्या चार नंतर जस-जसा दिवस सूर्यास्ताकडे झुकू लागतो, तसा हा पूल तरुण तरुणींच्या गदीर्ने फुल होतो. मात्र, हे महाविद्यालयीन तरुण गप्पा मारत बसतील तरीही ठीक. मात्र यापुढेही जाऊन कुठलीही मनात लाज न बाळगता इथे लज्जा उत्पन्न होईल, असे चाळे तरुण तरुणी बिनबोभाट उघड्यावर करतात. त्यामुळे येथील रहिवाशांना स्वत:च्याच घरी जाताना मान खाली घालून जावे लागत आहे. स्थानिकांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरत असल्याने मातृत्व धर्मदाय संस्थेने यावर काहीतरी तोडगा काढण्याची विनंती वाकड ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीधर जाधव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वाकड, रावेत, पुनावळे, ताथवडे, आकुर्डी या भागांत अनेक महाविद्यालये आहेत़ यातील बहुतेक विद्यार्थी-विद्यार्थिनी हॉस्टेलमध्ये किंवा खोली करून राहतात़ त्यामुळे या सर्वांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याने कॉलेज आणि हॉस्टेलपासून जवळच आणि आल्हाददायक वातावरण असलेला हा हँगिंग ब्रिज तरुणांचा जणू हक्काचा कपल डेस्टिनेशन (पॉइंट) बनला आहे. पुलाच्या आजूबाजूचा परिसर मोकळा असल्याने सायंकाळी या ठिकाणी आपोआपच रमणीय वातावरण तयार होते़ या पुलाला काहीजण लंडन ब्रिज तर काही जण हावडा ब्रिजसुद्धा म्हणतात़ प्रेमी युगुल येथे गर्दी करतात़ प्रेमाचे उघड प्रदर्शन करतात़ प्रेम आंधळे असते वैगेरे ठीक आहे, मात्र त्यांच्या या वागण्याने स्थानिकांवर डोळे बंद करून येथून जाण्याची वेळ आली आहे. येथे फिरायला येणारे तरुण-तरुणी आपली दुचाकी व चार चाकी पुलावर रस्त्यातच उभी करून बसतात़ त्यामुळे वाहतुकीचा खेळ खंडोबा होत आहे़ तर या मुलींच्या मागे मागे फिरणाऱ्या रोड रोमियोंची टोळी देखील येथे भटकत असते़
अनेक वेळा पुलावर किरकोळ स्वरूपात वाद होतात; याची वेळीच दखल घेऊन पोलिसांनी बंदोबस्त करावा अन्यथा एखादी मोठी घटना होऊ शकते, असे तुषार पवार यांनी व्यक्त केली.(वार्ताहर)