तरुणाने रिक्षाचालकाचा जीव वाचवण्यासाठी केले प्रयत्न...... चालकाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 12:29 PM2021-03-20T12:29:28+5:302021-03-20T12:41:57+5:30
दोन दिवसात रिक्षाचालकाची मालवली प्राणज्योत
एका रिक्षाचालकाला बेशुद्ध अवस्थेत पडलेले बघून रवी धावून गेला. त्या क्षणी सर्व सूत्रे हाती घेऊन त्यांना तातडीने रुग्णालयात जाण्याची सोय केली. त्यांच्यावर सुरु झालेल्या उपचारात पक्षाघात झाल्याचे कळाले. मात्र दोन दिवसात रिक्षाचालकाची प्राणज्योत मालवली. रवीने रिक्षा चालकाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले होते. पण पक्षाघाताने रिक्षाचालकाची मृत्यूशी झुंज मात्र अपयशी ठरली.
सोमवार १५ मार्च सकाळी ११ वाजता रवी कामाला जाताना टिळक पुलावर अचानक एका घोळक्यात शेख नावाचे रिक्षाचालक बेशुद्ध अवस्थेत पडलेले दिसले. श्वास सोडून त्यांच्यामध्ये जिवंत माणसाचे कुठलेही लक्षण जाणवत नव्हते. अशा परिस्थितीत रवीने सर्व सूत्र आपल्या हाती घेतली. बघ्यांच्या गर्दीत जमा झालेल्या एका रिक्षा चालकाच्या मदतीने यांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर ताबडतोब उपचाराला सुरुवात झाली. रुग्णालयातील डॉक्टर रिक्षा चालकाच्या ओळखीचे निघाले. मदतीसाठी आलेल्या रवी पुन्हा टिळक पुलावर आला. ज्येष्ठ रिक्षा चालकाची रिक्षा लॉक करून चावी परिचितांच्या स्वाधीन केली. आशेचे पंख लावून बसलेल्या रवीची मात्र निराशा झाली.
कामगार नेते नितीन पवार यांनी केला होता शेख यांचा पाठपुरावा
नितीन पवार यांनी इतर रिक्षा चालकांच्या माध्यमातून रवीची माहिती मिळवली. रवीशी संपर्क साधून शेख यांच्याबद्दल पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. रवीने शेख यांना कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर दोन दिवस शेख उपचारासाठी ससूनमध्ये दाखल झाल्याचे कळाले. गुरुवारी त्यांचे निधन झाल्याचे नितीन पवार यांना समजले.
रवी कदम हा मूळचा मराठवाडयाचा आहे. रोजगारासाठी सहा, सात वर्षांपासून पुण्यात नवी सांगवीला राहत आहे. दररोज सकाळी शनिवार पेठेत ऑफिसला जात असतो. नेहमीप्रमाणे महापालिकेच्या बस स्थानकावर उतरून टिळक पुलावरून ऑफिसला जात असतो. त्यादिवशीही असेच जात असताना ही घटना घडली.