'त्यांनी वार केला तर आम्ही प्रतिवार करणारच ना', स्वाभिमानीत हकालपट्टी, तुपकरांनी केली 'ही' घोषणा
By राजू इनामदार | Published: July 24, 2024 05:38 PM2024-07-24T17:38:56+5:302024-07-24T17:39:29+5:30
राज्याचा दौरा करून समविचारी तरूण शेतकऱ्यांना बरोबर घेत विधानसभेच्या २५ जागा लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले
पुणे: वयाच्या १७ व्या वर्षांपासून शेतकरी संघटनेत दिवसरात्र काम करतो आहे. आधी शरद जोशी, मग राजू शेट्टी. शेटी यांनी संधी दिली तर मीही त्याचे सोने केले, त्यांची मनमानी सहन करायचे कारण नाही अशी टीका करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी, राजू शेट्टी यांचे सहकारी रविकांत तूपकर यांनी नव्या महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीची घोषणा केली. राज्याचा दौरा करून समविचारी तरूण शेतकऱ्यांना बरोबर घेत विधानसभेच्या २५ जागा लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
शेतकरी संघटनेचे पदाधिकारी जालिंदर कामठे यांनी मंगळवारी पुण्यात पत्रकार परिषद घेत तुपकर यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून काढून टाकल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर गुरूवारी तुपकर यांनी पुण्यातच मेळावा आयोजित करून दुपारी पत्रकार परिषद घेतली व नव्या संघटनेची घोषणा केली. राज्यातील २७ जिल्ह्यांमधील अनेक तरूण युवा कार्यकर्ते आपल्याबरोबर असल्याचा दावा त्यांनी केला. शेट्टी यांच्यावर त्यांनी यावेळी बरीच टीका केली. त्यांच्या खासदारकीसाठी ते तडजोडी करत फिरत होते, संघटनेचे महत्व त्यांना नव्हतेच अशी टीका तुपकर यांनी केली.
तुपकर र्म्हणाले, मी संघटनेच्या नेहमीच बैठका घेत असतो. ते म्हणतात न सांगता बैठका घेतल्या जातात. कार्यकर्त्यांना माहिती देण्यासाठी बैठका घेण्यात गैर काय आहे? त्यांनी केलेल्या कारवाईने मला धक्का बसला. याला उत्तर द्यायचेच असा कार्यकर्त्यांचा आग्रह झाला. त्यामुळे पुण्यात मेळावा घेतला. स्वाभिमानी मधील काकासाहेब साबळे, डॉ. ज्ञानेश्वर टाले, शाम अवथरे, दयाल राऊत, सूर्या अडवाल, सूरज निंबाते असे अनेकजण मेळाव्याला आहेत. १०० जणांचे नियोजन होते, ५०० जण आले आहेत असा दावा तुपकर यांनी केला.
त्यांनी वार केला तर आम्ही प्रतिवार करणारच ना असे ते म्हणाले. महाराष्ट्र क्रांतीकारी संघटना स्थापन करण्याचा निर्णय आता झाला आहे. राज्याचा दौरा करून समविचारी संघटना, लहान पक्ष यांचे एकत्रिकरण करून राज्यात तिसरी आघाडी तयार करणार असल्याचे तुपकर यांनी सांगितले. मेळाव्यात शेतकरी चळवळ पुढे न्यायची असा निर्णय झाला. सोयाबीन,कापूस कांदा पीक विमा या सर्व विषयांना घेऊन क्रांतीकारी आघाडीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन उभे करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.