रवींद्र बऱ्हाटेला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:09 AM2021-07-08T04:09:29+5:302021-07-08T04:09:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : जमीन लाटणे, जमिनींच्या कागदपत्रात फेरफार, खंडणी, फसवणूक असे तब्बल १२ गुन्हे दाखल असलेला आणि ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जमीन लाटणे, जमिनींच्या कागदपत्रात फेरफार, खंडणी, फसवणूक असे तब्बल १२ गुन्हे दाखल असलेला आणि गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा माहिती अधिकार कार्यकर्ता रवीद्र बऱ्हाटे याला बुधवारी १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष मोक्का न्यायाधीश एस.आर.नावंदर यांनी दिला.
एक वर्षाहून अधिक काळ तो फरार होता. त्या कालावधीत ऑनलाईन खुरापती सुरूच असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याने कायद्याला सामोरे जाण्याचे टाळून फरार कालावधीत माध्यमांद्वारे स्वत:चे उदात्तीकरण करण्याबरोबरच तपासयंत्रणा, न्यायव्यवस्था, शासनव्यवस्था, साथीदार फिर्यादी यांच्यावर टीका टिप्पणी करून दबावाखाली ठेवून खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा युक्तीवाद विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी केला. तो ग्राह्य धरून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान, यापूर्वी अटक झालेली रवींद्र बऱ्हाटेची पत्नी संगीता (वय ४९, रा. धनकवडी) आणि वकील सुनील अशोक मोरे (४९) यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर, मुलगा मयूर याच्या पोलीस कोठडीत दोन दिवस वाढ करण्यात आली आहे.
बऱ्हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरू होते. त्याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले. त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते. मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता. पुणे परिसरात तो काही काळ लपून बसला. त्यानंतर सोलापूर, सातारा या भागात राहिला. त्यानंतर तो गुजरात, हैद्राबाद, कर्नाटक या राज्यात फिरत होता. अखेर बऱ्हाटे पोलिसांना शरण गेला. त्यानुसार मंगळवारी (दि. ६) दुपारी तो पोलीस आयुक्तालयात आला. पोलिसांनी त्याला अटक केली. बुधवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले.