रवींद्र बऱ्हाटेच्या मुलाला गुन्हे शाखेकडून अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:09 AM2021-07-02T04:09:44+5:302021-07-02T04:09:44+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या पत्नीपाठोपाठ गुन्हे शाखेने त्याचा मुलगा मयूर रवींद्र बऱ्हाटे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे याच्या पत्नीपाठोपाठ गुन्हे शाखेने त्याचा मुलगा मयूर रवींद्र बऱ्हाटे (वय २१, रा. धनकवडी) याला आज रात्री उशिरा अटक केली आहे. दरम्यान, काल अटक केलल्या बऱ्हाटे याची पत्नी संगीता बऱ्हाटे आणि पितांबर धिवार यांना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
हडपसर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या कटात सहभाग असल्याचे पुरावे गुन्हे शाखेच्या पथकाला हाती लागल्यानंतर गुरुवारी मयूर बऱ्हाटे याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यालयात त्याला आणून चौकशी करण्यात आली. त्यात त्याचा सहभाग आढळून आल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
रवींद्र बऱ्हाटे हा गेल्या दीड वर्षापासून फरार आहे. काही दिवसांपूर्वी त्याचे काही व्हिडिओ व्हायरल झाले होते. हे व्हिडिओ बनविण्यासाठी मदत केल्याचे व त्याच्या संपर्कात असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने गुन्हे शाखेने बुधवारी पितांबर धिवार याला अटक केली होती. तसेच गुन्ह्यात सहकार्य केल्याने व त्याच्या संपर्कात असल्याचे निष्पन्न झाल्याने बऱ्हाटे यांची पत्नी संगीता बऱ्हाटे हिलाही अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले. अधिक तपासासाठी न्यायालयाने दोघांची ५ दिवस पोलीस कोठडी मंजूर केली आहे.