माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटेच्या पत्नीला गुन्हे शाखेकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2021 07:06 PM2021-06-30T19:06:39+5:302021-06-30T21:35:44+5:30
फसवणुकीच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हे शाखेला संशय; व्हिडिओ बनविण्यास मदत करणार्या पिंताबर धिवार यालाही अटक
पुणे : माहिती अधिकार कार्यकर्ता आणि गेल्या दीड वर्षांपासून फरारी असलेला रवींद्र बर्हाटे याची पत्नी संगिता रवींद्र बर्हाटे (वय ५५) हिला गुन्हे शाखेने आज कटात सहभागी असल्याच्या कारणावरुन अटक केली आहे. त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी रवींद्र बर्हाटे याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ बनविण्यास मदत करणार्या पिंताबर धिवार यालाही अटक करण्यात आली आहे.
सुमंत रंगनाथ देठे (वय ५८, रा. मांजरी ग्रीन, मांजरी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलिसांनी महाराष्ट्र सावकारी अधि़ तसेच अनु. जाती़ व अनु. जमाती कायद्याखाली हा गुन्हा दाखल केला होता. रवींद्र बर्हाटे, पत्रकार देवेंद्र जैन, बडतर्फ पोलीस शैलेश जगताप यांच्यासह १३ जणांवर मोक्का अंतर्गत करवाई करण्यात आली आहे. रवींद्र बर्हाटे याच्या संपर्कात राहून कटात सहभागी झाल्याच्या आरोपावरुन ही अटक करण्यात आली आहे. तसेच बर्हाटे याला व्हिडिओ बनविण्यास मदत करणार्या व यातील आरोपी सचिन गुलाब धिवार याचा भाऊ पिंताबर धिवार यालाही अटक करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी रवींद्र बर्हाटे याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात त्याने आपण कशा पद्धतीने हे सर्व केले याची माहिती दिली होती. हा व्हिडिओ तयार करण्यासाठी पिंताबर धिवार याने मदत केल्याचे समोर असल्याने त्याला आज अटक करण्यात आली आहे.
रवींद्र बर्हाटे हा टोळीप्रमुख असून त्याच्यासह एकूण १३हून अधिक लोकांवर १२ गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी हडपसर, कोथरुड, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात बर्हाटे टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
रवींद्र बर्हाटे हा कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यापासून फरारी आहे. त्याचा न्यायालयाने त्याला फरार घोषित केल्यानंतर त्याची मालमत्ता जप्तीची कारवाई महसुल विभागाने केली आहे.
बर्हाटे याचा शोध घेण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शहर पोलीस दलाचे अखंड प्रयत्न सुरु आहेत. बर्हाटे याच्याशी त्याची पत्नी संगीता या संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेने त्यांना आज दुपारी ताब्यात घेऊन पोलीस आयुक्त कार्यालयात आणले. तेथे त्यांची अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त सुरेंद्रकुमार देशमुख यांनी चौकशी केली. त्यानंतर सायंकाळी त्यांना हडपसर येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.
रवींद्र बर्हाटे याच्या घरावर पोलिसांनी छापा घातला होता. त्यावेळी त्याच्याकडे मोठ्या प्रमाणावर जमिनीची कागदपत्रे, अनेक कोरे धनादेश सापडले असून त्यांची मालमत्ता सुमारे २ हजार कोटी रुपयांपर्यंत असल्याचे आढळून आले होते.
रविंद्र बर्हाटे फरार झाल्यापासून पिंताबर धिवार त्याच्या संपर्कात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच मागील काही दिवसापुर्वी बर्हाटे याने सहा व्हिडीओ आणि पाच व्हिडीओ समाज माध्यमावर प्रसारीत केले होते. त्यामध्ये त्याने साक्षीदार, फिर्यादी, तपास अधिकारी यांच्यावर दबाव आण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच विविध आरोप देखील केले होते. हे सर्व व्हिडीओ व ऑडीओ तयार करून प्रसारीत करण्याच्या कामात पितांबर याने त्याला मदत केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यानुसार त्याला अटक केली आहे.