Kasba By Election Result: "शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर..."; मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकरांची प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 12:17 PM2023-03-02T12:17:07+5:302023-03-02T12:17:37+5:30
Kasba By Election Result: कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते.
कसबा पोटनिवडणुकीत भाजपाकडून हेमंत रासने यांच्या विरोधात महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांच्यात चुरशीची लढत झाली. त्यामध्ये रविंद्र धंगेकरांचा विजय झाला आहे. रविंद्र धंगेकर ११ हजार ४० मतांनी विजयी झाले आहेत.
रविंद्र धंगेकर यांनी विजयानंतर प्रतिक्रिया दिली आहे. पैशांचा पाऊस थांबला आणि आज मतांचा पाऊस पडत आहे. जनतेने त्यांना स्विकारलं नाही. आशीर्वाद घेणे ही परंपरा आहे. त्यामुळे मी १०० टक्के गिरीश बापट यांना भेटायला जाणार आहे. ५० खोके एकदम ओके हे फक्त इथेच नाही तर महाराष्ट्रात दिसतंय. आणि हे परिवर्तन राज्यभर होणार आहे. शिवसेनेवर जो हल्ला केला, हे त्याचं उत्तर असल्याचं देखील रविंद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे.
कसब्याच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले होते. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली. या मतमोजणीत रविंद्र धंगेकरांचा विजय निश्चित झाला आहे. कसब्यामध्ये महाविकास आघाडी उमेदवार रविंद्र धंगेकर आणि महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्यात थेट लढत होती. दोन्ही बाजूने जोरदार प्रचार करण्यात आला होता.
कोण आहेत रविंद्र धंगेकर?
रविंद्र धंगेकर यांचा शिवसेना, मनसे आणि काँग्रेस असा त्रिकोणी राजकीय प्रवास झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू अशी धंगेकरांची ओळख राहिली आहे. मनसेमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या पदावर काम केलं. इथंच त्यांची राजकीय कारकीर्द फुलली. ४ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याकाळात त्यांनी कसब्यामध्ये बरीचं विकासकामं केली.
याच विकासकामांच्या जोरावर त्यांनी मनसेकडून २००९ ची विधानसभा निवडणूक लढली. यात त्यांनी भाजपचे विद्यमान खासदार आणि तत्कालिन उमेदवार गिरीश बापट यांना तगडं आव्हान दिलं. मातब्बर बापट नवख्या धंगेकरांकडून अवघ्या ७ हजार मतांनी विजयी झाले. यातूनच खासदार गिरीश बापट यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. २०१४ मध्येही कसबा पेठेतून धंगेकरांनी निवडणूक लढवली. पण तेव्हा त्यांचा पराभव झाला. पुढे जानेवारी २०१७ मध्ये कॉंग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत धंगेकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण २०१९ मध्ये काँग्रेसनं धंगेकरांऐवजी अरविंद शिंदेंना तिकीट दिलं होतं.